नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची किनवट तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी नाही; ता.कृषी अधिका-यांचा अनागोंदी कारभार
किनवट/प्रतिनिधी— नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची किनवट तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतक-यांना लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे. तालुका कृषी अधिका-यांच्या अनागोंदी कारभारामुळे तालुका पातळीवरील यंत्रणेला चिरीमिरी दिल्याशिवाय फाईलच पुढे सरकत नाही.
आॅनलाईन पत्रव्यवहार, जायमोक्यावरचे छायाचित्र, पडताळणी प्रक्रियेनंतरही जागतिक बँकेच्या अर्थसहायापासून शेतक-याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुकावे लागत असल्याने, दाभाडी सज्जातील संतप्त शेतक-यांनी भ्रष्ट यंत्रणेच्या कामकाजाच्या चौकशीची आणि कार्यवाहीची मागणी केली आहे.
शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी म्हणून कदाचित महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प किनवट तालुक्यात कार्यान्वीत केला असावा, असा शेतक-यांचा भोळा समज होता. परंतु किनवट तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्ट व लाचार यंत्रणेमुळे प्रकल्पाची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीच होत नसल्याने गरजु शेतक-यांना लाभापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवले जात आहे. चिरीमिरी न दिल्यामुळे दाभाडीतील कांही शेतक-यांना तुषार सिंचन संचाच्या अर्थसहायापासून वंचित केले आहे.
एजंसीकडून तुषारसंच उचल केल्यानंतर खातरजमा करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील दाभाडी विभागाचे कृषी पर्यवेक्षक जाधव यांनी शेत गट क्र.१९ मध्ये जाऊन स्थळ पंचनामा व चित्रीकरण केले. परंतु प्रपत्रातील रखाणे निरंक ठेऊन फाईल बंद दस्त्यात फेकून सेवानिवृतीवर निघून गेले. कालांतराने त्यांच्या जागेवर दुसरे पर्यवेक्षक म्हणून जाधवच प्रगटले. त्यांनीही जवळपास पुर्वीच्याच जाधवांचाच कित्ता गिरवला. त्यांनीही फाईल नेऊन तीन महिने लोटलीत. याची कल्पना कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांना दिली परंतु पालथ्या घागरीवर पाणी टाकल्याचाच प्रकाराचा प्रत्येय पहावयास मिळाला असल्याचे शेतक-यांचे म्हणने आहे. या प्रकरणाची तारीखनिहाय संचिकांची तपासणी आणि विलंबाविषयी संबंधितांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी बी.एल.कागणे या शेतक-याने केली आहे.