मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेडसह मराठवाड्यातील विकास प्रश्न मार्गी लावा-अशोकराव चव्हाण* *मंत्रिमंडळ बैठकीत केवळ घोषणा नको तर अंमलबजावणी व्हावी
संजीवकुमार गायकवाड जिल्हाप्रतिनिधी नांदेड, दि. 12-विनाअट महाराष्ट्रामध्ये विलिन झालेल्या मराठवाड्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासाच्या केवळ घोषणा न करता या बाबत ठोस निर्णय घेवून अंमलबजावणी करावी व नांदेडसह मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शनिवार दि. 16 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी ठोस निर्णय घेण्याची शासनास ही संधी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक हा केवळ फार्स ठरू नये. यातून विकास कामांची घोषणा व त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 75 वर्षांच्या निमित्ताने मराठवाड्यातील कमीत कमी 75 महत्त्वाची कामे मंजूर करावीत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील प्रस्तावित डॉ.शंकरराव चव्हाण कृषी महाविद्यालयास मंजुरी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कालवा व त्यावरील क्षतीग्रस्त बांधकामाच्या विशेष दुरुस्तीसाठी 450 कोटी रुपयांचा निधी, पोचमपाड धरणाच्या बॅक वॉटरवर सभासदांच्या शेतजमिनीच्या सिंचनासाठी बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी 1984 मध्ये आपल्या जमिनी तारण ठेवून जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेल्या 2.05 कोटी रूपयांच्या कर्जाची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम सदर प्रकल्प कार्यान्वीत न होऊ शकल्याने माफ करणे, नांदेड विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधीची तरतूद मंजूर करून धावपट्टीची लांबी वाढविण्यास मंजुरी देणे आणि नांदेड येथून नियमित विमानसेवा तत्काळ सुरु करणे, मुलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेंतर्गत नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीतील 60 कामांकरिता मंजूर 100 कोटी रूपयांपैकी 50 कोटी रूपयांचा निधी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अप्राप्त असणे, नांदेड-लातूर दरम्यान थेट नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवणे व या प्रकल्पाकरिता राज्य शासन व केंद्र शासनाचा निधी मंजूर करणे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प जालना-नांदेड जोडद्रुतगती महामार्गाच्या कामास गती देणे व निश्चित कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे, विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कॅन्सर हॉस्पिटलला मंजुरी देणे या कामांचा समावेश आहे. ही कामे मंजूर झाल्यास नांदेड जिल्ह्याचा विकास पुन्हा ट्रॅकवर येईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
नांदेड सोबतच मराठवाड्यातील इतर जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न या बैठकीत मार्गी लावावेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.