हाता पायाच्या जखमा बाप माझा रोज वाचायचा… कितीही झोडपले अवकाळीने तरीही तो जगायचा…
जि.प. शिक्षकांसाठी संकल्प प्रतिष्ठानचे कविसंमेलन रंगले; रसिकांनी दिली कवी कवयित्रींना उत्स्फूर्त दाद
नांदेड – हाता पायाच्या जखमा बाप माझा वाचायचा कितीही झोडपले अवकाळीने तरीही तो जगायचा’ या काव्यपंक्तीने सभागृहास अंतर्मुख करीत किनवट येथील कवी रमेश मुनेश्वर यांनी कितीही संकटे आली तरी ती झेलत माझा शेतकरी बाप न डगमगता, आत्महत्येचा विचारही मनात न आणता येईल त्या प्रसंगाला तोंड देत माझा बाप जगायचा असा विचार देत संकल्प प्रतिष्ठान आयोजित कविसंमेलनात प्रबोधन केले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ, उद्घाटक म्हणून महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, लेखाधिकारी संतोष कंदेवार, भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, नांदेड जि.प. चे उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, ईद ए मिलापचे मार्गदर्शक एम एम खान इसाप प्रकाशनचे प्रकाशक दत्ता डांगे आदींची उपस्थिती होती.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पवित्र रमजान ईदच्या पावनपर्वावर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील कुसुम सभागृहात ईद ए मिलाप – संकल्प कवींची साद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर अविनाश भुताळे आणि प्रमोद फुलारी यांनी स्वागत गीत गायले. प्रख्यात बासरीवादक ऐनोद्दीन वारसी आणि विठ्ठल चुनाळे यांनी बासरीवादन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी संपन्न झालेल्य कविसंमेलनात आता हैद्राबादी, विरभद्र मिरेवाड, रमेश मुनेश्वर, पांडूरंग कोकुलवार, प्रज्ञाधर ढवळे, एकनाथ डुमणे, बालाजी सुतार, शोभा नलाबले, विनोद चव्हाण, दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत कदम, ज्योती रावते, राहुल जोंधळे, सुप्रिया पेंडकर, ना. सा. येवतीकर, विजया तारु, बाबाराव विश्वकर्मा, अर्चना गरुड, ज्योती वाठोरे, सागर चक्के, विजय ढोबे, अनुपमा बन, प्रल्हाद तेलंग, मिलिंद जाधव, उद्धव सोनकांबळे, भारतध्वज सरपे, एम.टी. शेख, अलिम असराद, रुपेश मुनेश्वर, बळी अंबुलगेकर, भगवान जोगदंड यांच्यासह अनेक कवींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला म. बसवेश्वर , राजमाता जिजाऊ, म. फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमास रीतसर सुरुवात झाली. मान्यवर आणि उपस्थित कवी आणि कवयित्री यांच्या यथोचित सत्कारानंतर सुप्रसिद्ध विचारवंत एम. एम. खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एकापेक्षा एक सरस आणि सुरस कविता तथा गझलांचे सादरीकरण करीत तीन तास एक बहारदार काव्यमैफिल रंगली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी बामणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी तर कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक विरभद्र मिरेवाड यांनी केले. आभार संकल्प मित्र कवी मनोहर बसवंते यांनी मानले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी संकल्प मित्र तस्लीम शेख, मुखीम सिद्दीकी, प्रल्हाद राठोड, बालाजी बामणे, प्रशांत भिंगोले, दिगांबर शेळके, उदय देवकांबळे, वैजनाथ पसरगे, अभय शेटकार, संघपाल वाठोरे, शिवा वाघमारे, नाथाभाऊ केंद्रे, माधव पचलिंग आदींनी परिश्रम घेतले.