किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी. व्ही. भालेराव म्हणजे आमचे चालते बोलते विद्यापीठ -स्वप्नील भालेराव

माझे काका सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी. व्ही. भालेराव म्हणजे आमचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी अनेक तरुणांचे आयुष्य घडवले, माणसं अभी केली, संसार जुळवले, समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातल. मात्र २९ मार्च २०२१ रोजी त्यांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तब्बल एक महिना त्यांनी उपचार घेवून कोरोनावर मात केली. मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. उपचार घेत असतांना १८ मे २०२१ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अचानकपणे जाण्याने सच्चा कार्यकर्ता, बाप, मार्गदर्शक, आधारवड हरवला आहे. आज त्यांचा जन्म दिवस. त्यानिमित्ताने एक खास आठवण…

गावाला लग्न असणं म्हणजे मनाला आनंदाचं उधाण आल्यासारखं… त्यातं माझ्या सख्या भावाचं लग्न ठरलं… त्यामुळं आमच्या भावडांमध्ये एक वेगळाचं आनंद निर्माण झाला होता. घरातलं पहिलं लग्न म्हटल्यावर आमचा आनंद गगनात मावतं नव्हता. प्रत्येकाला लग्नाची वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. त्यामध्ये मला नातेवाईकांना आमंत्रण देण्याचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं.

माझं मुळ गावं जिवती तालूक्यातील केकेझरी. साधारण गावात २०० घर असतील. एकाच गावात चार आत्या, त्यांची मुल, नातवंडं तसेच काका, काकू, भाऊ असं साऱ्या परिवाराचं मिळून गाव बनलं आहे. चारी बाजूनं डोंगररांगा, गावाच्या बाजूने खळखळ वाहनारा ओढा, पाण्यानी तुडूंब भरलेल्या विहीरी, हिरवागार परिसर पाहून निसर्गाच्या कुशीत गाव वसलेलं आहे याची जाणीव होतो. गावं सोडून आम्हाला ३५ वर्षे झाली. पण, आजही आठवणींचा खजिना ताजा आहे. गावात दोन खोल्याचं घर, पाच एकराचा तुकटा, घरासमोर अंगणं, अंगणात कडू लिंबाच झाड मोठ्या दिमाखात डोलत आहे.

संपूर्ण गावचं नातेवाईक असल्यामुळे निमंत्रण पत्रिका देण्यासाठी जाणं भाग होतं. “मोटारसायकलवर मी एकटा गावाला जायला नको” म्हणून माझे काका डी. व्ही. भालेराव माझ्यासोबत निघाले. अनेक शौर्य पदक प्राप्त करुन पोलिस उपअधिक्षक पदावरून काका नुकतेच निवृत्त झाले होते. पदाचा कोणताही बडेजाव त्यांच्यासोबत नव्हता, साधी राहणीमान, प्रचंड वाचणाचा व्यासंग, मोठा जनसंपर्क, लोकांना जोडून ठेवण्याची कला, यामुळे सर्वांना ते आपलेसे वाटतात. चाळीस वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोलिस अधिकारी, कोणताही मोठेपणा न करता, वयाच्या ६० वर्षांनंतरही दुचाकीवर प्रवास करण्यासाठी तयार झाले. हा आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे.

माणसाचं वय वाढलं तरी तो मनाने तरुण असतो. हे मला काकांकडे पाहिलं की नेहमी जाणवायचं. वडिलांच्या मृत्यूनंतर माझं शिक्षण काकांकडे झालं. काकाकडे पाहिलं की, माझा बाप त्यांच्यात दिसतो. म्हणून मी काकांना पप्पा म्हणतो… त्यांचा प्रभाव माझ्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे, असे नातेवाईक नेहमी सांगत असतात.

शेवटी आम्ही निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी निघालो. सतत दोन तास दुचाकी चालवल्यानंतर काकाने गाडी थांबवण्यासाठी सांगितले. हॉटेल पाहून मी गाडी थांबली. आम्ही फ्रेश झालो, चहा घेतला आणि तेथून पुढील प्रवासाला निघणार तेवढ्यात, काकाने चावी मागितली. काकांना दुचाकी चालवता येत होती. पण या वयात गाडी चालवणार म्हणजे कठीण काम होतं. काकाने माझ्यापेक्षा सफाईदार गाडी चालवली. सतत दोन तास गाडी चालवत असताना “रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता” हेच समजतं नव्हते. रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झाल्यामुळे मला थकवा आला होता. कदाचित काकांना यांची जाणीव झाली असेल म्हणून त्यांनी मला गाडी थांबवण्यास सांगितली आणि स्वत: चालक झाले.

काही वेळानंतर आम्ही गावी पोहोचलो. चहा नाष्टा झाला, महत्त्वाचं काम म्हणजे, लग्न पत्रिका वाटप करण्याचं… सर्वांना निमंत्रण पत्रिका वाटप केल्यानंतर माझ्या घरासमोर गेलो. आई- वडिलांनी कष्टाने बांधलेलं घर पाहिलं की, माझ्या आजीचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. आजी नेहमी सांगायची की, “लेकरा तुझ्या बापानं लई जिवाचं रान करुन घर बांधलय रं, वाघ होता तुझा बाप” मग डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटाय च्या. आज माझा बाप असता तर, किती बरं झालं असतं असं वाटायचं. पाणावलेले डोळे लोकांना नकळतं पुसले आणि लिंबाच्या झाडाखाली थोडावेळ बसलो.

खुप वर्षांनंतर मी गावी गेलो होतो. त्यामुळे आत्याने गोड-धोडं केलं होतं. रात्रीचा पाहुणचार खुप छान झाला. उन्हाळा सुरु झाला होता. सर्वंत्र रखरखत उन्हं पडलं होतं. विदर्भात सर्वांत जास्त उन्हाचं तापमान असतं. दुपारी रस्त्यावर काळ कुत्र सुध्दा दिसत नव्हतं. उन्हाचा तडाखा आम्हाला लागू नये म्हणून सुर्य डोक्यावर येण्याआधी घरी पोहोचलं पाहिजे. या बेताने सुर्येदयापूर्वीच केकेझरी येथून आम्ही सातनाला मार्गे लोणी (ता. किनवट जि. नांदेड) निघालो.

११० कि.मी. सलग गाडी चालवली त्यामुळे थकवा आला होता. हॉटेल पाहून रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. थंड पाणी आणि चहा घेतला. मी थकलोय याची जाणीव काकांना झाली असावी. त्यामुळे काकांनी गाडी चालवण्यासाठी घेतली. काका धिम्या गतीने गाडी चालवत होते. मी, हेल्मेट घालून मागे बसलो होतो. जलसिंचनासाठी सात दरवाचे असलेले ‘सातनाला’ धरण तेलंगणा राज्यात बांधण्यात आलं आहे. दरवाज्यावरून ‘सातनाला’ धरण असं नाव ठेवण्यातं आलं. धरणाजवळुन एक रस्ता जातो त्याला सातनाला मार्ग असे म्हणतात.

धरणाजवळ एका कठीण वळणावर गाडीवरचे नियंत्रण सुटले. आम्ही गाडीसह डांबरी रस्त्यावर १५ ते २० मीटर घसरत गेलो. मी डोळे उघडून बघतोय तर काय! काका रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत लांब पडले होते. त्यांच्याकडे पाहून माझा जोरात हंबरडा फुटला. पप्पा!!! एकीकडे मोटारसायकल नालीत पडून होती तर दुसरीकडे बेशुद्ध पडलेल्या काकांना पाहून मी खूप घाबरलो होतो. काकांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मदतीसाठी जोर- जोरात हाका मारल्या… आकांत केला… तेलंगाना राज्यातली आरोग्य सेवा चांगली आहे असं वर्तमान पत्रातून वाचलं होतं. म्हणून तात्काळ आपत्कालीन रुग्णवाहिका १०८ नंबरवर कॉल केला पण मदत मिळाली नाही.

पुन्हा मदतीसाठी गळा फाडून आवाज दिला. शेवटी कापूस वेचण्यासाठी निघालेल्या महिलांनी माझा आवाज ऐकला. माऊली धावत माझ्या जवळ आल्या… मी रडताना पाहून केवीलवाण्या झाल्या… मला आधार देण्याचा प्रयत्न करत होत्या. “बाबू तू काऊन रडतो गा..! घे पाणी प्याले” म्हणत त्यांनी पाणी दिले. त्यांच्या जवळच पाणी घेवून आधी काकांच्या चेहऱ्यावर शिपंडल. थोड्याच वेळात काकाना जागं आली आणि माझा जीव जाग्यावर आला.

काकांना पाठीवर, पायावर, चेहऱ्यावर खुप मार लागला होता. एक डोळा पूर्ण बंद झाला होता. शुगर, बीपीचा त्रास असल्यामुळे अधिकच बेचैन झाले होते. त्यांच्या डोक्याला धरून एकीकडे पाणी पाजत होतो. तर दुसरीकडे खुप रडत होतो. शेवटी काकांनी मला शांत केलं. हा प्रसंग लिहिताना आजही माझ्या अंगावर काटे उभे राहतात.

महिलांच्या मदतीने गाडी ढकलत, ओढत डांबरी रस्त्यावर आणली. एका रिक्षात बसून काकांनी रुग्णालयात जावे, अशी विनवणी मी करत होतो. तरी, काका माझी एक गोष्ट एक गोष्ट ऐकायला तयार नव्हते, “बाळा मी ठिक आहे, तू गाडी चालू कर आपण मिळून रुग्णालयात जावू, मला फक्त खरचटलयं” म्हणत होते. संत गाडगे बाबा म्हणतात “देव हा दगडात नसून माणसात असतो.” याचा अनुभव मला त्या दिवशी आला. मदतीला आलेल्या महिलांत मला देव दिसला. मी सर्वांचे आभार मानले आणि प्रवासाला निघालो.

— स्वप्नील भालेराव,
९४२३८३६४२८
sbhalerao82@gmail.com

313 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.