केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर राज्य सरकार कृतकृत्य! वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी अशोकराव चव्हाण यांचे टीकास्त्र
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१५.भविष्यात मोठा प्रकल्प येण्याच्या आशेवर राज्य सरकारला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पळवण्याच्या गंभीर बाबीचा विसर पडून केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर ते कृतकृत्य होतात, हे निराशाजनक असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे.
महाराष्ट्राचे महत्त्व लक्षात घेता काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत भेटीवर येणारे बहुतांश राष्ट्रप्रमुख व विदेशी शिष्टमंडळे आवर्जून देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही दौरा करायचे.त्यासाठी केंद्र सरकार देखील प्रोत्साहन व सहकार्य द्यायचे.राज्याचा उद्योग मंत्री व मुख्यमंत्री म्हणून मी अशा अनेक विदेशी शिष्टमंडळांना भेटलो आहे.
मुख्यमंत्री असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांचेही मी मुंबईत स्वागत केले आहे.तत्पूर्वी बिल क्लिंटन यांचेही स्वागत करण्याची संधी मला लाभली आहे.
मात्र, मागील काही वर्षात विदेशी राष्ट्रप्रमुखांचे मुंबई दौरे जणू बंद झाले आहेत.यापश्चातही अनुकूल औद्योगिक वातावरणामुळे जे प्रकल्प महाराष्ट्रात येऊ इच्छितात,त्यांना इतर राज्यांमध्ये पळवून नेले जाते आहे.
महाराष्ट्रात 111अगोदरपासून सुरू असलेले प्रकल्प,कार्यालये आणि व्यवसायांचीही पळवापळवी सुरू आहे.ही संपूर्ण परिस्थिती अतिशय गंभीर व चिंतनीय आहे.महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून याबाबत भूमिका घेणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला केंद्राचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राशी संवाद ठेवलाच पाहिजे. मात्र, याचा अर्थ महाराष्ट्राने अगतिक व्हावे असा होत नाही.महाराष्ट्राची क्षमता व गुणवत्तेनुसार हक्काचे ते मिळालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका चव्हाण यांनी यावेळी मांडली.खरे तर वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी पंतप्रधानांचा हस्तक्षेप अपेक्षित होता.मात्र,राज्य सरकारच्या प्रतिक्रियेवरून तसे झालेले जाणवत नाही.
त्याऐवजी भविष्यात महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन मिळाले आहे.भविष्यात जे मिळेल ते मिळेल.महाराष्ट्राच्या अविकसित भागात केंद्राने एखादा मोठा प्रकल्प निश्चितपणे दिला पाहिजे. त्याचे आम्ही स्वागतच करू. मात्र, अगोदर वेदांता-फॉक्सकॉन परत द्यायला हवा.हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नसतो हे राज्य सरकारने ध्यानात ठेवावे,असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.