चुकीचे मीटर रिडींग, वीजबिल दुरूस्तीसाठी ग्राहकांना त्रास देणाऱ्या कंत्राटदारांना अखेर महावितरणचा दणका* नांदेडच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिकलसह राज्यातील ६ वीजमीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ
*नांदेड*:दि.17.महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.
यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरूस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास,मनस्ताप देणार्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल या एजन्सीचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई,नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे असे निर्देश दिले होते.त्यानुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दि.१ फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधला होता.
चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही.मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सी विरुद्ध महसूलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.
एजन्सीने केलेल्या मीटर रिडींगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरु करण्यात आली आहे.
त्यानुसार आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती परिमंडलमधील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस,सादलगाव ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडलमधील सुप्रीम पॉवर सर्व्हीसेस,अंधेरी (वसई विभाग),नांदेड परिमंडलमधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल,दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडलमधील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडलमधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे सुरु असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले.
परिणामी या एजन्सी विरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे,रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे,महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले.यामुळे महावितरणच्या महसूली नुकसानीसोबतच वीजग्राहकांना देखील चुकीच्या वीजबिलांच्या दुरूस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले.त्याची गांर्भियाने दखल घेत याआधीच दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे महावितरणकडून मीटर रीडींग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.तसेच इतर कंत्राटदारांना कामात कुचराई केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.