गांधीनगर वासीयांचे आजचे “निवारा शोध आंदोलन” मागे; प्रशासनाने दोन महिन्याचा मागितला कालावधी
किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील बेलोरी किनवट रस्त्याच्या बाजूला रेल्वे गेट जवळ स्थित असलेले गांधिनगर नगर येथील घरे गेल्या 2 महिन्या पूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाने जेसीबी द्वारे नेस्तनाबूत करण्यात आले व विस्थापित झालेल्या गांधीनगर वासियांना समतानगर येथे जागा देण्यात आली परंतु ती जागा असून त्यांच्या नावे करण्यात आली नसल्यामुळे कुआकांक्षा अरुण आळणे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू करण्यात आले. आज या उपोषणाचा 20 वा दिवस होता. आज या उपोषणकर्त्यांनी आकांक्षा आळणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला तसेच नगरपालिके समोर “निवारा शोध आंदोलन” करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे , नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जहीरोद्दीन खान आंदोलनाच्या नेत्या आकांक्षा आळणे यांची भाषणे झाली.
तदनंतर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी आंदोलन करतांना मार्गदर्शन केले व आपल्या मागण्या येणाऱ्या 2 महिन्यात सोडविण्याचा नगरपालिकेतर्फे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. यावरून आंदोलनकर्त्यांनी सदरील विनंतीस मान देऊन आजचे “निवारा शोध आंदोलन” मागे घेण्याचे कबूल केले. परंतु जोपर्यंत स्वतःचे घर स्वतःच्या नावे मिळणार नाही तोपर्यंत सदरील साखळी उपोषण चालूच राहणार असल्याचेही याप्रसंगी अरुण आळणे यांनी सांगितले. सदरील आंदोलना प्रसंगी किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.