विद्यार्थ्याला शाळेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना 21 हजार रुपये दंडासह सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.30. जिल्ह्यातील मुदखेड शहरात तीन विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी प्रत्येकाला 6 महिने कैद आणि 21 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
याप्रकरणातील एक आरोपी गुगलमिटद्वारे न्यायालयासमक्ष हजर करण्यात आला होता.
दंडाची रक्कम जमा झाल्यानंतर त्यातील 50 हजार रुपये रक्कम जातीवाचक शिवीगाळ झालेल्या पिडीत व्यक्तीला देण्याचे आदेश न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दिले आहेत.
दि.3 ऑगस्ट 2016 रोजी सौरभ संजय चौदंते या 12 वीच्या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी 3.30 वाजेच्यासुमारास शाम राजाराम शिरोळे(20), किशन बालाजी मोरे (23) आणि हनुमान कोंडीबा पल्लेवाड (21) रा.सन्मित्रनगर मुदखेड जि.नांदेड हे तिघे शाळेसमोर आले आणि गुरुजींकडे आमच्या बद्दल लावालावी करतोस काय असे सांगून जातीवाचक शिवीगाळ केली.सोबतच तुझ्या जातीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंद करू अशी धमकी दिली.
त्यानुसार मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2016 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1) (आर)(एस), भारतीय दंड संहितेच्या 323 आणि 34 नुसार दाखल झाला.गुन्ह्याचा प्रकार हा अनुसूचित जाती जमातीशी संबंधीत असल्याने या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांच्याकडे देण्यात आला.या प्रकरणात संपूर्ण तपास करून अर्चना पाटील यांनी तीन आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात या प्रकरणी सहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले.त्यात उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या प्रकरणातील तीन विद्यार्थी शाम राजाराम शिरोळे(20), किशन बालाजी मोरे (23) आणि हनुमान कोंडीबा पल्लेवाड (21) यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यासाठी दोषी मानले.
न्यायालयासमक्ष या प्रकरणातील एक आरोपी हनुमान कोंडीबा पल्लेवाड हा जालना तुरूंगात असल्याने त्याला शिक्षेबद्दलची माहिती गुगलमिटद्वारे देण्यात आली.त्यानंतर तिन्ही आरोपी शाम राजाराम शिरोळे,किशन बालाजी मोरे,हनुमान कोंडीबा पल्लेवाड या तिघांना न्यायालयाने ऍट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(1)(आर) साठी 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 3(1)(एस) साठी 10 हजार रुपये रोख दंड आणि 6 महिन्याची सक्त मजुरी तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 323 आणि 34 नुसार तिघांना सहा महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.याप्रकरणात दंडाचे 63 हजार रुपये जमा झाल्यानंतर त्यातील 50 हजार रुपये रक्कम या प्रकरणातील फिर्यादी सौरभ संजय चौदंते यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 357 नुसार देण्याचे आदेश दिले.
आरोपींना दिलेल्या सर्व शिक्षा त्यांना एकत्रीत भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ऍड. ए.डी. गोदमगावकर,ऍड.रणजित देशमुख,ऍड.यादव तळेगावकर यांनी मांडली.या खटल्यात पैरवी अधिकाऱ्याची भुमिका मुदखेडचे पोलीस अंमलदार अजय साखरे यांनी पुर्ण केली असे आमच्या प्रतिनिधीना सांगण्यात आले आहे.