किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पत्रकारितेतील एक झुंजार योद्धा : राजेश्‍वर कांबळे

जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपली एक ओळख घेऊन येत असतो. म्हणजेच सर्व माणसे ही वैशिष्ट्यांनी भरलेली असतात. कला गुणांनी युक्त असतात. पण जोपर्यंत आपण स्वतःचा शोध घेत नाही. तोपर्यंत आपले स्वअस्तित्व आपणास दिसणार नाही. म्हणून स्वतःला ओळखले पाहिजे. बुद्ध म्हणतात, स्वतः ला शरण जा. बुद्धं शरणं गच्छामि !माणूस आपल्या गुणांनी शोभून दिसतो. पण आपणच आधी आपल्यातील गुण ओळखला पाहिजे.
गुणाविना माणूस नाही
माणूसविना गुण नाही
जो स्वतःचा शोध घेई
दिव्य ज्ञान त्यास होई
माणसाची कीर्ती ही त्यांच्या अंगी असलेल्या गुणवैशिष्ट्यांवरून ठरत असते. मानवामध्ये गायन, विविध कला, खेळ, भाषिक कौशल्य आणि लेखन कला हे सुप्त गुण असतात. आपला विशेष गुण विकसित करण्याची कौशल आपणास साधता आले पाहिजे. आपल्या शब्द सामर्थ्याची लेखनातून समाजमनावर गौरवशाली छाप पाडून शस्त्रधारी, अस्त्रधारी शब्दकर्तुत्वाने यशाची उंच भरारी मारणारे पत्रकारितेतील शब्द सम्राट राजेश्‍वर कांबळे यांच्या उज्ज्वल कामगिरीविषयी लिहिण्याची मला संधी लाभली. हा एक माझ्यासाठी मी सुवर्णयोग समजतो. पत्रकार राजेश्‍वर कांबळे त्यांच्याविषयी जेवढं लिहिलं तेवढं कमीच आहे. मुळात राजेश्‍वर नावातच फार मोठा अर्थ दडलेला आहे. तो असा शांत, सुस्वभावी, मितभाषी, विद्याविभूषित, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रीय, निर्भीड, इतरांची मने जिंकणारा म्हणूनच मनाने श्रीमंत माणूस होय. त्यांच्या कार्याविषयी लिहायचंच झालं, तर ते या एका लेखात मावत नाहीत. हे सत्य आहे. सत्याचा पाठलाग करणारा, अन्यायाविरुद्ध झुंज देणारा‌ पत्रकारितेतील झुंजार योद्धा म्हणजे राजेश्‍वर कांबळे हे नाव अधोरेखित करावे लागेल.
आपण त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राकडे पाहिले असता ते उच्चशिक्षित आहेत. अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते एक आदर्श पत्रकारही आहेत. आणि एक गुरुही. आणि ही दोन्ही पदे उच्च प्रतीची मानली जातात. समाजाला प्रबोधन करून जागृत करणे. त्यांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करुन देणे. आणि इतर कल्याणकारी कामे होय. म्हणून ही पदे समाजाचा एक दुवा आहेत. त्याला नवी दिशा दिसतात. ह्याच दोन पवित्र पदांपैकी पत्रकारिता त्याने आपल्या जीवन कार्याची सुरुवात केली. असं म्हणतात जो यश शोधतो. त्यालाच यश मिळत असते. कारण क्षेत्र कोणतेही असो विद्वतापूर्वक आणि प्रामाणिकपणे राहून आपण त्या पदाशी एकनिष्ठ राहिलो, तर त्यांच्यासाठी यशाचे शिखर जवळच असते. विद्वतेला जगात मान असतो. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, क्षेत्रे पुजते राजाः विद्वान सर्वत्र पूज्यते।
आणि हिच किमया साधली ती राजेश्‍वर कांबळे यांनी. ग्रामीण भागात राहून शिक्षणाचे धडे घेतले. त्यांनी अडीअडचणीला तोंड दिले. असुविधांचा सामना केला. कारण आई-वडील अशिक्षित आहेत. पण पुरोगामी विचाराने भारावलेले आहेत. ते बुध्द, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे आहेत. ते धम्ममार्गाने चालणारे आहेत. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवातून ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र ते जपत आले आहेत. आणि म्हणून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी शहर जवळ केले. त्यांना सुसंस्कारांमध्ये वाढविले. आणि घरातील सर्व लेकरांना त्यांनी शिक्षित केले. त्या महान आई-वडिलांच्या प्रामाणिकपणाचा दाखला येथे आवर्जून द्यावासा वाटतो. कंधार शहरात येऊन त्यांनी मौसमानुरुप फळांचा व्यापार सुरू केला. एके दिवशी बाजारामध्ये त्यांना एका तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. सदरील अंगठी ४८ हजार रुपये किंमतीची होती. पण अर्ध्या तासात त्यांनी चौकशी करून ज्याची होती. त्याला ती परत केली. हिच तर खरी धम्माची ताकद आहे. सत्य या मूल्याचे पंचशील तत्त्वातील महत्त्व आहे. तिच बातमी वृत्तपत्रातून महाराष्ट्रभर पसरली. आणि महाराष्ट्राला प्रामाणिकतेचा धडा दिला. यातूनच राजेश्‍वर कांबळे यांच्या स्वभावाची जाण होते. म्हणूनच म्हणतात, ‘खाण तशी माती’ ही म्हण त्यांना सहज लागू पडेल.
पत्रकारिताचे शिक्षण पूर्ण करताना राजेश्‍वर कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता अभ्यासली आहे. त्यांनी लिहिलेले अग्रलेख, स्फुटलेखन, इतर वृत्त देण्याची पद्धत ही विशेष महत्त्वपूर्ण आणि लक्षणीय होती. कांबळे सर यांच्या लेखणीतून आणि शब्दातून आपणास ती दिसून येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन समाज जीवनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करणारे आहे. जीवनात मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांचा घटना प्रसंगाचा सूक्ष्मपणे त्यांनी मागोवा घेतला आहे. मागोवा प्रत्येक घटकांच्या घटकावयाच्या मुळापर्यंत जाणारा आहे. जे जे समाजहितकारक आणि समाजोपयोगी आहे. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले आहे. आणि हिच आदर्शवादी प्रेरणा राजेश्‍वर कांबळे यांच्या लेखणीला शब्दांच बळ देऊन उभारी देणारी ठरली. अशी म्हणून त्यांची लेखणी दबावाखाली येत नाही. कुणाच्या मर्जीसाठी लिहित नाही. तिने हक्कासाठी लढणाऱ्या लढाऊ वृत्तीचे व्रत स्वीकारले आहे. ती अन्यायाला वाचा फोडणारी, त्याचा पाढा वाचणारी आहे. लेखणीच्या शब्दातील ताकद आहे. संत तुकाराम महाराजांनी शब्दांचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्न करु।
शब्दची मुक्या जीवाचे
जीवनशब्दे वाटू धन जनलोका।।
पत्रकारिताचे शब्द हेच शस्त्र असतात. आणि शब्द हेच अस्त्र ही असतात. जगात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद त्यांच्या लेखणीतून दिसून येते. म्हणूनच तो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जातो. निपक्षपाती लिखाण करणारा, समाजहित साधणारा, लोककल्याणकारी, स्वच्छतादूत, शब्द सम्राट राजेश्‍वर कांबळे हे आपली प्रदीर्घ अशी दीड तपाची कारकीर्द पूर्ण करीत असून एक अभ्यासू आणि नामांकित पत्रकार म्हणून सर्वांना परिचित आहेत. जो त्यांच्या सहवासात येईल तो त्यांचाच होवून जाईल. आणि त्यांच्या कार्याला वाचूनच लिहिता होईल. आतापर्यंत आठ लेखकांनी आपल्या लेखनीतून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. आता हा नवव्या क्रमांकावर वाचकांपर्यंत पोहोचत आहे. ही खरच अभिनंदनीय बाब आहे. राजेश्‍वर कांबळे यांचे व्यक्तीमत्व तेजस्वी आहे. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षशील असा आहे. त्यांच्यावरही आई-वडिलांप्रमाणे बुद्ध, फुले, शाहू, डाॅ.आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आहे.
कांबळे हे सामाजिक तथा धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत. राजेश्‍वर कांबळे यांनी भदंत पय्याबोधी थेरो यांची श्रामणेर प्रशिक्षण केंद्र ता.जि.खुरगाव, नांदुसा येथे भेट घेऊन वाढदिवसानिमित्त एक खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये भदंत पय्याबोधी थेरोचा जीवनपट उलगडला. या मुलाखतीची जिल्ह्यात सर्वत्र जोरदार चर्चा झाली. राजेश्‍वर कांबळे यांना मातोश्री रमाबाई आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था, बेटमोगरा, ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने सन २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. अत्यंत कमी वयात त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची दखल घेऊन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.श्यामसुंदर शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नरंगले, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर आदींनी यथोचित सन्मान केला. कंधार तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड टेस्ट, कोविड लसीकरण, उपाययोजना या विषयी बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. एक कोविड योध्दा म्हणून ही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव ढवळे यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनाला व्यापक अशी प्रसिद्धी दिली. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन लसीकरण करुन घेतले, हे इथे अधोरेखित करणे आवश्यक आहे.
राजेश्‍वर कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. गेल्या १८ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी नि:पक्ष, निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, पर्यावरण, साहित्य, धार्मिक, क्रीडा व कृषी आदी क्षेत्रातील अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने लिखान केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित व शोषितांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अनेक युवा पत्रकारांना ते मार्गदर्शन करतात. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. आणि विविध संघटनेची पदे भुषविले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य कौतुउकास्पद आहे. ते एक पक्षी मित्र आणि शेतकरी मित्र म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे विविध पैलू सांगताना ते बहुआयामी आहेत हे एका शब्दात मांडणं कठीण आहे.
त्यांच्या कार्याची शासकीय व अशासकीय पातळीवर नोंद घेण्यात आली. त्यांना नेहरू आंतरराष्ट्रीय सामजिक पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकारत्न पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार, पत्रकारिता सन्मान पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. तसेच कंधार नगरपंचायत तर्फे केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी ‘ब्रँड अँम्बेसिडर’ म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली. ही भुषणावह बाब आहे. नुकताच त्यांना मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, ता.उमरी जि.नांदेडतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सन २०२० चा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजेश्‍वर कांबळे यांच्या आजी कालवश नागरबाई कांबळे यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी २५ जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचे आजीवर लहानपणापासूनच प्रचंड प्रेम होते. आजीच्या आरोग्याची ते नेहमी काळजी घेत होते. नातू म्हणून त्यांनी आजीची खूप सेवा केली. त्यांनी आपल्या आजीचा नैसर्गिक मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार हा आजी कालवश नागरबाई कांबळे यांना अर्पण केला. त्यानिमित्त पत्रकार राजेश्‍वर कांबळे सरांचे मनस्वी अभिनंदन. भावी काळात त्यांची लेखनी अशीच लोकहितासाठी गती घेवो. तद्वतच पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

– बाबुराव पाईकराव, डोंगरकडा
मो. 9665711514

71 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.