एक लाख संविधानाच्या प्रती मोफत वाटण्याचा संकल्प
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांचा पुढाकार
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने एक लाख संविधानाच्या मोफत प्रती राज्यातील सर्व शाळांमधून वाटण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १४ एप्रिल २०२३ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान (एक लाख प्रती) मोफत वाटण्यात येणार आहेत.
या महासंकल्पाचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला झाला. प्रातिनिधिक स्वरूपात पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुल, चाटे पब्लिक स्कुल, महात्मा गांधी विद्यालय, अभिनव विद्यालय, सनब्राईट स्कुल इत्यादी शाळांना पाटील यांच्या हस्ते संविधान सुपूर्द करण्यात आले. प्रसंगी आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, सागर पानसरे, हर्षद दौंडकर, ऍड. मंदार जोशी, ऍड. अपूर्वा लिमये, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ध्रुव जगताप, बामणे सर, मुक्ता बर्वे, भालेकर सर, संदीप बेलदरे, संघदीप शेलार,इत्यादी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने घेतलेला हा उपक्रम महत्वपूर्ण आहेत. प्रत्येक अडचणींवर उपाय असलेल्या संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगायला हवे. त्यासाठी शाळांमधून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हायला हवे.”
शशिकांत कांबळे म्हणाले, “बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन काम केले, तर उद्याचा भारत घडेल. संविधान प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. राज्याच्या ३६ जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील शाळांत हे संविधान पोहोचविण्यासाठी हा महासंकल्प उपयुक्त ठरेल. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे.”
ऍड. मंदार जोशी यांच्यासह शाळांच्या प्रतिनिधींनी या महासंकल्पाविषयी भावना व्यक्त केल्या.