टॅलेंटची कमी नाही ,तरीही जिंकण्याची हमी नाही !!! – डॉ .अंकुश गोतावळे
वरील वाक्य हे मातंग समाजासाठी तंतोतंत लागू होते .कारण मातंग समाजातील जे कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करीत आहेत त्यांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की ,एक से बढकर एक असे प्रतिभासंपन्न ,अभ्यासू ,निडर ,प्रामाणिक कार्यकर्ते समाजात असल्याचे दिसून येते .आणि ते प्रामाणिकपणे समाजासाठी काम करीत असल्याचे निदर्शनास येते .तरीसुद्धा समाजातील समस्या का मिटत नाहीत ?समाजाची प्रगती का होत नाही ?असे प्रश्न पडणे साहजिक आहे .कदाचित याचे उत्तर पुढील उदाहरणामधून सापडेल .
चार सर्वगुणसंपन्न लोकं निवडले आणि त्यांना चार दिशेला म्हणजे पूर्वेला ,पश्चिमेला ,दक्षिणेला आणि उत्तरेला तोंड करून एकमेकांपासून 5 फूट अंतरावर उभे केले .पूर्वेला ज्याचे तोंड आहे त्याच्या कमरेला दोर बांधला आणि तोच दोर पश्चिमेला तोंड असलेल्याच्या कमरेला बांधला तसेच दक्षिणेला ज्याचे तोंड आहे त्याच्या कमरेला दोर बांधला आणि तोच दोर पूर्व पश्चिम बांधलेल्या दोरावरून उत्तरेला तोंड असलेल्या व्यक्तीच्या कमरेला बांधला आणि दोन्ही दोर जेथे एकमेकांना मध्यभागी क्रॉस होतात तेथे गाठ पाढली आणि या चार दिशेला तोंड असलेल्या व्यक्तींच्या समोर एका स्टूलवर एक वस्तू ठेवली आणि जो वस्तू उचलेल तो विजेता असे म्हटले आणि चौघांनाही ती वस्तू उचलायला सांगितले .तर चौघेही प्रामाणिकपणे आणि ताकतीने आपापल्या दिशेने दुसऱ्यांना ओढण्याचा प्रयत्न करतील आणि थकूनही जातील पण तरीही ती वस्तू उचलू शकणार नाहीत त्यामुळे कुणीच विजेता होणार नाही .कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या दिशेला ताकत लावत आहेत ,अगदी प्रामाणिकपणे आणि ताकतीने काम करीत असताना सुद्धा कुणालाच ती वस्तू उचलता येणार नाही .कारण इतर तिघांची ताकत,परिश्रम ,वेळ विरुद्ध बाजूला वाया जात आहे आणि त्यामुळे जिंकता कुणालाही येत नाही .(समस्या निवारण होत नाही .)अगदी हीच अवस्था मातंग कार्यकर्त्यांची झाली आहे .
जर का सामंजस्याने घेतले एकमेकांशी समन्वय साधला तर चौघांनाही जिंकता येते पण आमच्या डोक्यात पूर्वीपासून एकच आहे की जिंकण्यासाठी दुसऱ्याला हरवलेच पाहिजे .पण प्रत्येकवेळी तसे नसते कारण जो स्टूलावरील वस्तू उचलेल तो विजेता असे ठरले आहे त्यामुळे जे जे वस्तू उचलतील ते ते विजेते आणि सगळ्यांनाच विजेता होता येईल .असे होणे काही कठीण नाही .कारण जेव्हा पूर्वेकडे तोंड असलेला व्यक्ती ताकतीने ओढेल तेव्हा बाकी तिघांनी थोडेसे त्या बाजूस सरकायचे तो वस्तू उचलेल त्यानंतर पश्चिमेकडच्या व्यक्तीने त्याच्या दिशेला ओढायचे तेव्हा इतर तिघांनी त्या दिशेला सरकले तर तोही वस्तू उचलेल आणि असेच दक्षिण व उत्तर दिशेचा व्यक्तीही जिंकेल .आणि त्यांच्या या सामंजस्यामुळे ताकत जास्त लागणार नाही ,जास्त परिश्रम करावे लागणार नाहीत ,वेळही जास्त लागणार नाही आणि या सर्व गोष्टींची बचत होऊनही चौघांनाही जिंकता येईल . बांधवानो मातंग समाजाच्या नेत्यांना समाजाचे प्रश्न सोडविणे किंवा त्यांचे राजकीय स्वप्न अस्तित्वात आणणे फार कठीण नाही .पण गरज आहे आपल्या बांधवांच्या दिशेने योग्य वेळी त्याची ताकत ओळखून आपण तिकडे सरकण्याची आणि नेमकं हेच मातंग नेते करीत नाहीत आणि त्यामुळे कुणीच विजेताही होत नाही ,तर हे आहे आपल्या अपयशाचे कारण .
बांधवानो मातंग समाजाने जर हा फॉर्मुला वापरला तर मातंग समाज हा सर्वच पातळ्यांवर दखलपात्र होऊ शकतो .जर मातंग समाजाने एक राज्यस्तरीय “मातंग समन्वय समिती “बनविली आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या चार विंग बनविल्या जसे कि सामाजिक विंग ,कर्मचारी विंग ,अन्याय निवारण विंग व राजकीय विंग .
सामाजिक विंग मार्फत शासकीय योजना व आर्थिक उन्नतीच्या प्रश्नांना घेऊन वारंवार आंदोलने, मोर्चे करणे आणि यावेळी इतर तीन विंग नी सामाजिक विंग च्या पाठीशी राहणे .(उदा .लोकस्वराज्य आंदोलन ,दलित आंदोलन ,दलित महासंघ,लाल सेना इत्यादी सारखे फक्त एकच )
दुसरी कर्मचारी विंग यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्यभर चळवळ राबविली पाहिजे आणि यांना इतर तीन विंग नी मदत केली पाहिजे .(उदा .ल सा क म ,बिसेफ, एम जि डी इत्यादी सारखे फक्त एकच )
तिसरी अन्याय निवारण विंग या विंग ने समजावर होणाऱ्या अन्याया विरोधात पोलीस प्रशासन व न्यायालय याठिकाणी पिडीतास मदत करून न्याय मिळवून दिला पाहिजे तसेच शासकीय मदत व पीडिताचे पुनर्वसन यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि इतर तीन विंग नी याना मदत केली पाहिजे .(मातंग समाज अन्याय निवारण समिती सारखे फक्त एकच )
चौथी विंग राजकीय विंग ,या विंगने समाजाचा राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात दबावगट निर्माण केला पाहिजे आणि योग्य वेळी एखाद्या मोठ्या राजकीय पक्षासोबत युती करून विधानसभा आणि लोकसभेत समाजाच्या व्यक्तीस पाठविले पाहिजे .आणि या विंगला इतर तीन विंगणी पक्षवाढीसाठी आणि निवडणुकांमध्ये मदत केली पाहिजे .(उदा .डीपीआय ,मानवहीत पार्टी ,जनहित पार्टी व इतर सारखे फक्त एकच )
असे जर झाले तर समाजाच्या प्रत्येक नागरिकास आपल्या आवडीनुसार कुठल्याही एका विंग मध्ये काम करता येईल आणि इतर तीन विंग च्या कार्यात ही वेळोवेळी मदत करता येईल .प्रत्येक विंगचे नेते दुसऱ्या विंगच्या कामात लुडबुड करणार नाहीत ,कूट खाणार नाहीत किंवा एकमेकांचे कपडेही फाडणार नाहीत आणि एकाच दणक्यात समाज आणि सामाजिक नेते हे समाजकारणात ,राजकारणात आणि प्रशासन दरबारी दखलपात्र होतील .तसेच पुढील पिढी नोकऱ्या व उधोगांमध्ये जाऊन आर्थिक संपन्नहोईल .किती साधं आणि सोपं गणित आहे सगळं पण आमच्या नेत्यांना तेच समजत नाही किंवा त्यांना समजूनच घ्यायचे नाही .
आणि मातंग नेते असेच चार दिशांना तोंड करून लढत राहिले तर कधीच यशस्वी होणार नाहीत आणि त्यांनी विकासाचे स्वप्न पाहणे म्हणजे मृगजळा मागे धावल्या सारखे होईल ,तहानेने व्याकुळ होतील ,पाय खोरुन मरतील पण मृगजळ मिळणार नाही .म्हणजे विकास कधीच होणार नाही आणि कितीही टॅलेंट असले तरी यश कधीच मिळणार नाही. त्यामुळे सामाजिक नेत्यांनी स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून समाजाला मोठेपण प्राप्त करून देण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधला आणि चार विंग चा फॉर्मुला वापरला तर यश निश्चित आहे .त्यामुळे कहती है बुढी लेकिन सुनता है कौन ! असे करू नये ;नाहीतर ,
टॅलेंटची कमी नाही ,तरीही जिंकण्याची हमी नाही !!
हा ठपका घेऊनच जगावे लागेल हेच शाश्वत सत्य ठरेल .
डॉ अंकुश गोतावळे
चंद्रपूर
8390902408