पक्षप्रवेश घेऊन बी आर एस ने किनवट तालुक्यात नारळ फोडले! | तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी बी आर एस हा एकमेव सक्षम पर्याय.,…. धनलाल पवार
किनवट (प्रतिनिधी) तेलंगणा राज्यातील के सी आर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने किनवट तालुक्यात मजबूत पाय रोवण्यास सुरुवात केली असून 24 मार्च रोजी धनलाल पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा पहिला वहिला पक्षप्रवेश सोहळा येथील तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात संपन्न झाला यावेळी किनवट तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे नेते व असंख्य महिलांनी बी आर एस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. किनवट माहूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष हा एकमेव सक्षम पर्याय असल्याचे यावेळी धनलाल पवार यांनी सांगितले असून किनवट जिल्हा करायचा असेल तर के सी आर यांचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
दि 26 मार्च 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात भारत राष्ट्र समितीची ऐतिहासिक सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर धनलाल पवार यांच्या नेतृत्वाखाली दि 23 मार्च रोजी येथील तहसील कार्यालयासमोर बीआरएसचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता त्यावेळी पवार बोलत होते मंचावर यांची बी आर एस पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक, माजी उपसभापती रामरेडी आईटवार, दिलीप नाईक नरसिंग नेमानीवार , सेवानिवृत्त लेखा अधिकारी प्रेमसिंग जाधव, फरीद भाई यांच्यासह आदीची.प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मांडवी येथील माजी जि प सदस्य सौ नंदाबाई धनलाल पवार, चिखली येथील शेख इमरान शेख मेहबूब, गंगाधर येरडलावार, श्रीनिवास नेमानिवार,साहेबराव गरड यांच्यासह तालुक्यातील गोंडजेवली, धामणदरी,बेंदीतांडा, गोकुंदा लसनवाडी, राजगड, अंजी, घोटी राजगड तांडा, अंबाडी, गोंडजेवली येथील विविध पक्षाचे कार्यकर्ते,सामाजिक संघटनेचे नेते व मांडवी भागातील शेकडो महिलांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनलाल पवार यांच्या हस्ते बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी धनलाल पवार म्हणाले की तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या किनवट तालुक्याची अवस्था सध्या बिकट बनली आहे.शेतकरी शेतमजूर व गोरगरिबांच्या मूलभूत गरजा जशाच्या तशा आहेत.येथील राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना तालुक्याच्या विकासाबद्दल कवडीचीही आस्था राहिलेली नाही.विकासाच्या नावावर अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हाच नेत्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. मागील 30 वर्षापासून प्रलंबित असलेली किनवट जिल्हा निर्मितीची मागणी अद्याप पूर्ण झाली ही पूर्ण करायची असेल भारत राष्ट समिती हा एकमेव सक्षम पर्याय आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केसीआर यांनी समाजातील सर्वच घटकासाठी लागू महत्वकांक्षी योजनांची माहिती दिली असून अशाच योजना किनवट मध्ये राबविण्यासाठी बीआरएस पक्षात सामील होण्याचे आवाहन केले. 26 मार्च 2023 रोजी लोहा येथे होणाऱ्या सभेच्या प्रचारार्थ हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केल्याचे स्पष्ट करत भविष्यात याच जागेवर मुख्यमंत्री केसीआर यांची ऐतिहासिक सभा घेणाऱ असल्याची घोषणाही धनलाल पवार यांनी केली. ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक यांनी आपल्या भाषणातून तालुक्याच्या विकासावर प्रश्न उपस्थित करत किनवट तालुका तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी केली.
सूत्रसंचालन सेवादास जाधव यांनी केले तर यांनी बी आर एस पक्षाचे नरर्सिंग नेमानीवार उपस्थितांचे आभार मानले.
या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमास किनवट तालुक्यातील व शहरातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.