वेगाचे वारे व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी पालकमंत्री मा.ना.गिरीश महाजन यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन
नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी /संजीवकुमार गायकवाड:
वेगाचे वारे व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नांदेड चे पालकमंत्री मा. ना. गिरीश महाजन यांना माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक शंकरराव चव्हाण यांनी दिले.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, लोहा, कंधार, मुखेड या तालुक्यामध्ये दि.16 व 17 मार्च 2023 रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्या सोबतच अतिवेगाने वाहिलेल्या वाऱ्यामुळे शेतातील पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या गारपीट, अवकाळी पाऊस व अतिवेगाच्या वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक पिके व फळबागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यासोबतच जनावरांचे गोठ्यावरील छत उडून गेले आहे. अनेक पत्रांची घरे उध्वस्त झाल्यामुळे नागरिक रस्त्यावर आले आहेत. या सर्वांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
अर्धापूर, मुदखेड व भोकर तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्य प्रमाणात केळी, टरबूज, खरबूज, भाजीपाला या पिकांचे उत्पादन घेतात. अचानक आलेला वादळी वारा व झालेली गारपीट यामुळे या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील शेतकरी रस्त्यावर आला आहे. या सोबतच कंधार, लोहा व मुखेड तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतीच्या नुकसानीसह पाळीव जनावरे व घरांचे नुकसान झाले आहे. या सर्वांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
शासनाच्या सूचनेनुसान अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही. त्यासोबतच टरबूज, खरबूज, भाजीपाला, हळद या पिकांना विमा संरक्षण नाही. अशा वेळी अचानकपणे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या या शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यांना केळी या पिकासाठी 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान वाऱ्याचा वेग तासी 40 किमीच्या वर गेल्यास हेक्टरी 70 हजार रुपये देणे बंधनकारक आहे. स्कायमेटरवरील नोंदीनूसार नांदेड जिल्ह्यात हा वेग 55 ते 60 किमी असा नोंदविण्यात आला आहे. तसेच याच भागात मोठी गारपीट झाली आहे. गारपीटीचे 46 हजार 667 रुपये मिळणे गरजेचे आहे. या दोन्ही रक्कमेची एकत्रित बेरीज करता प्रति हेक्टरी शासनाच्यावतीने 1 लाख 16 हजार 667 रुपये तात्काळ मिळणे गरजेचे आहे. हाच निकष पिक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा लावण्यात यावा.
अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या आवाहनानूसार मोठ्या प्रमाणात शेड नेट व पॉलीहाऊसची निर्मिती केली आहे. त्यांना तसे शासनाचे अनुदानही मिळाले आहे. परंतु हे शेडनेटवरील नेट व पॉलीहाऊसवरील पॉलीफिल्म वाऱ्याच्या अतिवेगामुळे उडून गेेले आहे. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले असून त्यांना अनुदानाच्या रुपाने पुन्हा एकदा नेट शेडवरील नेट व पॉलीहाऊसवरील पॉलीफिल्म बसविण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत देणे आवश्यक आहे.
केळी पिक वगळता इतर पिकांसाठी एनडीआरएफ निकषानूसार जास्तीत जास्त 18 हजार रुपये मदत मिळू शकते, परंतू प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी कमीत कमी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी.
या सर्व बाबींचा विचार करुन जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी विनंती केली आहे.