बहुजन महापुरूषांना भारतरत्न द्यावे, यासाठी 10 ऑक्टोबर रोजी नांदेडात धरणे आंदोलन
नांदेड दि. 8 –
बहुजन समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या महापुरूषाच्या सन्मानार्थ आम्ही नांदेड जिल्ह्यातील समग्र बहुजन समाजातील सत्यशोधक विचाराचे विचारवंत, कार्यकर्ते यांच्या वतीने सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले, राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक लोकनेते राजर्षी शाहूजी महाराज, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हे सर्व आमचे आदर्श, बहुजन महापुरूष, राष्ट्रनिर्मात्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, ही मागणी घेऊन सोमवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महात्मा फुले पुतळा नांदेड येथे प्रचंड धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपले आदर्श, क्रांतीकारक, बहुजन महापुरूष यांना भारतरत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी होणार्या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन ओबीसी समन्वय समिती, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन, लोकस्वराज्य आंदोलन, बीसेफ, लसाकम, मानवहीत लोकशाही पार्टी, भारतीय लहूजी सेना, लहूजी शक्ती सेना, राष्ट्रीय गुरू रविदास समता परिषद, मानवी हक्क अभियान, राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, परिवर्तन मंच आदी सामाजिक संघटनेमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.