शिवशंकर एंटरप्राइजेसने केलेल्या बोगस कामामुळे एका महिन्याच्या आतच कुष्णूर येथील तलावाची पाळूच खचली.
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.जिल्यातील नायगाव तालुक्यात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने कुष्णूर येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ४१ लाखाचा खर्च करण्यात आला. मात्र संबधीत अधिकारी आणि गुतेदाराच्या संगणमताने कामाचे तीन तेरा वाजवण्यात आल्याने महिनाभरातच तलावाची पाळू खचली.तलाव फूटण्याच्या परिस्थितीत आला. गावकऱ्यांनी तातडीने सांडव्याचा भाग जेसीबीने तोडल्याने अनर्थ टळला.अन्यथा शेकडो एकर जमीनीतील पिकांचे नुकसान झाले असते.
जलसंधारण विभागाने नायगाव उपविभागातील नायगावसह, बिलोली व देगलूर तालुक्यातील गाव तलाव, पाझर तलाव,सिंचन तलाव व कोल्हापूरी बंधाऱ्याचे कामांचा बोजवारा उडवून आपले खिसे भरण्याची मोहीम उघडली असे दिसून येत आहे.मांजरम येथील सिंचन तलावाच्या दुरुस्तीचे काम बंजारा विमुक्त जाती मजूर संस्थेच्या नावावर एका कार्यकर्त्यांने करुन तलावाचे तीन तेरा वाजवल्याने पहील्याच पावसात फुटण्याच्या मार्गावर आला होता.या तलावाचे थातूरमातूर काम करुन कशीतरी वेळ मारुन नेली.
मांजरम तलावाच्या कामाची चर्चा थांबते न थांबते तेच कुष्णूर पाझर तलावाची एका ठिकाणी पाळूच खचली.त्यामुळे तलाव केव्हाही फुटू शकतो अशी शक्यता निर्माण झाली होती. हि माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी तलावाकडे धाव घेतली. परिस्थिती पाहील्यावर तलाव केव्हाही फुटण्याची शक्यता असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी व काही गावकऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. पण त्यांनी या प्रकाराला गांभीर्याने घेतले नसल्याने गावकऱ्यांनी दोन जेसीबीच्या सहाय्याने सांडव्याचा भाग तोडून पाणी सोडून दिले त्यामुळे तलाव फुटण्यापासून वाचला.
दरम्यान उशिरा नायगाव मृद व जलसंधारण उपविभागाचे अधिकारी आले.अधिकारी उशिरा आल्याने सयंमाचा बाध सुटलेल्या गावकरी आणि शेतकऱ्यांनी प्रचंड धारेवर धरत त्यांच्या कुळाचा उद्धार केला. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.विषेश म्हणजे कुष्णूर पाझर तलावाच्या दुरुसीसाठी ४१ लाख ४८ हजाराची तरतूद होती आणि (ता.१७) रोजी शिवशंकर एंटरप्राइजेसला कार्यारंभ आदेश दिला होता.पण शिवशंकर ने जुन महिण्याच्या शेवटी शेवटी कामाला सुरुवात केली जे काम केले ते थातूरमातूर करण्यात आले.या कामावर मृद व जलसंधारण उपविभागीय अधिकारी किंवा एकाही शाखा अभियंत्यांने लक्ष दिले नाही.
त्यामुळे कंत्राटदारांने दुरुस्तीच्या कामाचा अक्षरशः बोजवारा वाजवून स्वतःचे आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचे काम केल्याने थेट पाझर तलावालाच धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेवून दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.