कोणाच्या बंडखोरीने शिवसेनेला फरक पडत नाही खासदार हेमंत पाटील; यांनी शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांशी साधला संवाद
नांदेड: आयुष्यात प्रत्येकाकडेच पद, पैसा येतो जातो. परंतू प्रतिष्ठा ही सर्वश्रेष्ठ असते. एकदा गेलेली प्रतिष्ठा पुन्हा येत नाही. शिवसेना पक्ष एका दिवसात तयार झालेला पक्ष नाही. बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांनी मजबुत केलेला खंबीर पक्ष आहे. म्हणून कोणाच्या बंडखोरीने शिवसेनेला फारसा फरक पडत नाही. असे वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता.तीन) सिद्धी मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार हेमंत पाटील बोलत होते. या प्रसंगी संपर्कप्रमुख आनंद जाधव, दिपक शेंडे, विवेक घोलप, माजी आमदार श्रीमती अनसूया खेडकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा समन्वयक धोंडु पाटील, डॉ. मनोजराज भंडारी, प्रकाश मारावार, भुजंग पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर तिडके पाटील, उमेश मुंडे, जयवंत कदम, युवा सेनेचे माधव पावडे, बालासाहेब देशमुख, बंडु पावडे, सचिन किसवे, नेताजी भोसले, निकीता चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, बालाजी कल्याणकर पक्षाशी गद्दारी करेल असे कधीच वाटले नव्हते, परंतू बालाजी कल्याणकरांच्या बंडाकडे शिवसैनिकांनी दूर्लक्ष करत भूतकाळ समजून विसरुन जावे आणि शिवसैनिकांनी पुन्हा नव्या दमाने कामाला लागले पाहिजे असा सल्ला खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.
यावेळी संपर्क प्रमुख आनंद जाधव म्हणाले की, सुरुवातीच्या काळात खासदार हेमंत पाटील यांच्यावर देखील काही शिवसैनिकांनी शंका घेतली होती. परंतू खासदार हेमंत पाटील हे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर शंका घेणे चुकीचे आहे. बालाजी कल्याणकर यांना गरीब समजून पक्षाने आमदाराकीचे तिकीट दिले. परंतू ते इतक्या लवकर शिवसेनेला गद्दार झाले. भविष्यात त्यांना कधीच गुलाल लागला नाही पाहिजे असा धडा त्यांना शिवसैनिक शिकवतील यात शंका नाही. परंतु शिवसेनेच्या काही पदाधिकारी यांनी बालाजी कल्याणकर यांच्या समर्थनात पोस्टरबाजी केली त्यांना देखील जिल्हा प्रमुखांनी तात्काळ पदावरुन हटवून त्यांच्या जागी नव्याने पदाधिकाऱ्यांची नेमणूक करावी असा सल्ला संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी जिल्हा प्रमुखांना दिला. यावेळी शिवसेनेच्या मेळाव्यात अनेक पदाधिकारी यांनी देखील बालाजी कल्याणकराच्या बंडा विषयी नाराजी व्यक्त करत त्यांना धडा शिकवण्याचा संकल्प केला.