राज्यातील महाविकास आघाडीची स्थिती भक्कम – आ.मोहनराव हंबर्डे यांचा विश्वास
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.25.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वमान्य नेतृत्व,पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमुल्य मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी भक्कम स्थितीत आहे,हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील,असा विश्वास व्यक्त करून नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी महाविकास आघाडीला आपला पूर्णपणे पाठींबा असल्याचे स्पष्ट केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत खिंडार पडल्यानंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. मोहनराव हंबर्डे यांनी उद्धव ठाकरे सरकारला कोणताही धोका नसल्याचे नमूद केले. बदलत्या राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते एकजुटीने काम करीत आहेत. बैठकांचे सत्र सुरु असून महाविकास आघाडीतील सर्व आमदार आपल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.
मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात या सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला.पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिणचा कायापालट होत आहे.
कोटयवधींची प्रलंबीत विकास कामे पूर्ण झाली,तर आजही अनेक विकास कामे सुरु आहेत. उर्वरित कालावधीत ही कामेही पूर्ण होतील,त्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण समर्थ आहेत.त्यामुळे विकास कामाबाबत कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही,असे आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक कठीण प्रसंगावर मात करीत सरकार यशस्वीरित्या चालविले,कोरोना काळातील त्यांच्या यशस्वी कार्यपद्धतीबाबत इतर राज्यांनीही त्यांचे कौतुक केले.
महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा आणि सहभागी पक्षातील आमदारांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे हे सरकार यापुढेही भक्कमपणे कार्यरत राहील,असा आत्मविकास आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी व्यक्त केला आहे.