मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या होट्टल महोत्सवास ९ एप्रिल पासून प्रारंभ* *पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन* *तीन दिवस रोज सायंकाळी विविध कार्यक्रमांची मांदियाळी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.७.तेलंगणा आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेल्या देगलूर पासून ८ किमी अंतरावरील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्य शैली एक सुस्थितीत कोरीव लेणे असलेले मंदिर आहे.
मराठवाड्याच्या या समृद्ध वारसा स्थळाला पुढे आणण्यासाठी व या भागातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून नवनवीन साधणे उपलब्ध व्हावीत यादृष्टिने होट्टल महोत्सवाकडे पाहिले जाते.
मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख म्हणून होट्टल महोत्सवाकडे पाहिले जाते. बहुप्रतिक्षेत असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ ९ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून खासदार प्रतापतराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील,खासदार सुधाकर श्रृंगारे हे प्रमुख अतिथी म्हणून या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेचे सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे, अमर राजूरकर,राम पाटील रातोळीकर,विधानसभा सदस्य आमदार भीमराव केराम,आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड,आमदार शामसुंदर शिंदे,आमदार मोहनराव हंबर्डे,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार राजेश पवार,आमदार जितेश अंतापूरकर,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शनिवार ९ एप्रिल ते सोमवार ११ एप्रिल या तीन दिवसीय समारोहात पहिला दिवस प्रथितयश गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबाहर गाण्यांची मैफल होणार आहे. शनिवार ९ एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. या महोत्सवाचा मुख्य उद्घाटन समारोह झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरूवात होईल. रविवार १० एप्रिल रोजी सायं. ५.३० ते ६.००यावेळेत औरंगाबाद येथील खंडेराय प्रतिष्ठाण गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर करेल. गायन, वादन,नृत्य व लोकगीत याचे सुरेख मिश्रण या कार्यक्रमात असेल.ललीत कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रृती संतोष पोरवाल या कथ्थक नृत्य सादर करतील. यानंतर ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व संच बासरी वादन करतील.सायं. ८ ते ९ या कालावधीत राजेश ठाकरे हे शास्त्रीय गायन,डॉ.भरत जैठवाणी हे शास्त्रीय नृत्य तर विजय जोशी हे मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हा कार्यक्रम सादर करतील.
सोमवार ११ एप्रिल रोजी औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरेपाटील हे लोकसहभागातून विकास याबाबत लोकप्रबोधन करतील.
यानंतर स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव खास लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून कु. सोनल भेदेकर, कु. विद्याश्री येमचे, “अप्सरा आली”च्या अर्चना सावंत व संच हे लावणीच्या कार्यक्रम सादर करतील.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव-2022 संपन्न होत असून यासाठी आमदार अमर राजूरकर,आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर,आमदार जितेश अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून या महोत्सव संपन्न होत आहे.
या महोत्सवास लोकांनी भरभरून प्रतिसाद दयावा,असे आवाहन या महोत्सवाचे विनीत म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,पर्यटन उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर,होट्टल येथील सरपंच हनिफाबी युसूफमिया शेख यांनी केले आहे.