किनवटला रेल्वेचे रॅक पॉइंट उभारण्यास अनुकूलता
किनवट/प्रतिनिधी – नांदेडच्या माळटेकडीच्या धर्तीवर किनवट येथे रेल्वेचे गुड्स रॅक पॉइंट देण्याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दि.२५ येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सकारात्मकता दर्शविली आहे. किनवट,माहूर तालुक्यासह शेजारच्या विदर्भ व तेलंगणात दररोज शेकडो टन विविध मालांची आवक – जावक होते.व्यापाऱ्यांसोबतच शेतकरी,ग्राहकांच्या हिताच्यादृष्टीने किनवट येथे रेल्वेचे गुड्स रॅक पॉइंट देण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे.हीच मागणी घेऊन येथील रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेतली होती.
अखेर रेल्वे प्रशासनाने किनवट येथे गुड्स रॅक उभारणीसाठी अनुकूलता दाखविली.शुक्रवारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अधिकारी जयपाल पाटील व डॉ.अनिरुद्घ यांनी येथे भेट दिली.जागेच्या पाहाणीनंतर येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध असोसिएशनच्या व्यापाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेतली.प्रास्ताविकात सहायक जिल्हाधिकारी पुजार यांनी रॅक पॉइंटमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती दिली.यावेळी मजविपचे गंगन्ना नेम्मानीवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिनकरराव चाडावार, पालिकेचे सभापती अजय चाडावार,व्यापारी अनिल पाटील, गौरव नेम्मानीवार यांनी रॅक पॉइंट त्वरित उभारण्यात यावे,अशी मागणी केली.व्यापाऱ्यांच्या मनोगतानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रॅक पॉइंट उभारण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.बैठकीस मजविपचे शाखाध्यक्ष नारायणराव सिडाम,माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार,फेरोज हिराणी,किरण किनवटकर,गजानन वट्टमवार, ओंकार वट्टमवार,राजू कटलावार,बसी आदी उपस्थित होते.माजी नगराध्यक्ष के.मूर्ती यांनी आभार मानले.बैठकीत अधिकाऱ्यांना तपोवन व बंगलुरु एक्स्प्रेस आदिलाबादहून त्वरित सोडण्यात यावी,अशीही मागणी करण्यात आली.