जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी आग्रही चाकूर येथील शिक्षक दरबारात आ. विक्रम काळे यांचे प्रतिपादन
*शंभर टक्के अनुदानित शाळांना पंचेवीस हजारांची पुस्तके देणार*
*चाकूर तालुक्यातील सर्व शंभर टक्के अनुदानित शासकीय व खासगी संस्थेच्या शाळांना पंचवीस हजार रुपयांची प्रत्येक शाळेला पुस्तके देणार असल्याचे आश्वासनही आ.विक्रम काळे यांनी शिक्षक दरबारात बोलताना दिले. यामुळे विद्यार्थी व शिक्षकात वाचन संस्कृती वाढीस लागण्यास मदत होईल असेही ते म्हणाले*
चाकुर ता.प्र.सलीमभाई तांबोळीः-पेन्शन हे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी आपली आग्रही भूमिका असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
चाकूर येथील जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात चाकूर तालुका राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दरबारात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. डॉ. रमाकांत घाडगे , राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, चेअरमन प्रल्हाद इगे , सिनेट सदस्य प्रा.अशोक मोटे , जुक्टा संघटनेचे जिल्हा सचिव प्रा.बाळासाहेब बचाटे , केंद्रप्रमुख बालाजी बावचे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात पुढे बोलताना आ.काळे म्हणाले की २००५ नंतर सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने त्यांना भविष्यकाळात मोठी अडचण निर्माण होणार आहे. अशी अडचण भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांना होणार नाही यासाठीच आपण शासन दरबारी २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली असून त्यामुळेच राज्य सरकारने सम्यक समिती स्थापन केली असल्याची माहितीही आमदार काळे यांनी दिली. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्वी जिल्हा स्तरावर शिक्षक दरबाराचे आयोजन केले जात असे परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक शिक्षकांना येण्यासाठी अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने आता तालुकास्तरावरही शिक्षक दरबार घेऊन शिक्षकांच्या अडी-अडचणी जागेवर सोडण्यासाठी हा शिक्षक दरबाराचा प्रयत्न सुरू केला असल्याचे सांगून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही आ. काळे म्हणाले. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीने देशात आणि राज्यात मोठे थैमान घातले आहे.या कोरोनाची सर्वात जास्त हानी ही शिक्षण क्षेत्राची झाली आहे.त्यांचे कधीच भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे. विद्यार्थी हे आपले दैवत आहेत.विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून आपण शिक्षक आहोत याची जाण सर्व शिक्षकांनी ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले. मी सर्व शिक्षकांचा आमदार असल्याकारणाने आमदार निधी देताना मी कधीच पक्षपात केला नाही. मतदार संघात मी कधीच पक्ष पहिला नाही.शिक्षक हाच माझा पक्ष ही माझी भूमिका आहे आणि पुढील काळात ती राहणार आहे.दोन लाखापर्यंत शिक्षणाधिकारी यांना तर तीन लाखापर्यंत शिक्षण उपसंचालकांना वैद्यकीय बिलाच्या मंजूरीसाठी परवानगी दिली असून यामुळे जिल्ह्यातच बहुतांशी सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाची पूर्तता होत आहे. यापुढे जावून वैद्यकीय बिलासाठी कॕशलेस ट्रिटमेंट योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही आ. काळे म्हणाले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवर सुरू करण्यात आले असून या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरराचा लाभ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी घ्यावा असेही आवाहन केले.
शिक्षक दरबारा निमित्त शुक्रवार दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळीच आ.विक्रम काळे यांचे चाकूर तालुक्यात आगमन झाले होते.सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना त्यांनी सदिच्छा भेट देऊन तेथील शिक्षकांशी संवाद साधून शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यात संत गोविंदबाबा विद्यालय लातूररोड , डॉ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा लातूररोड , केशवराव पाटील विद्यालय बोथी , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय राचन्नावाडी , महात्मा फुले विद्यालय बोरगाव , डॉ.मधुसुदन बांगड विद्यालय अजनसोंडा , जिल्हा परिषद प्रा.शाळा अजनसोंडा ,हरीभाऊ मुळे विद्यालय धनगरवाडी , शांती निकेतन विद्यालय मुळकी , नेहरु विद्यालय नायगाव , राजीव गांधी विद्यालय आनंदवाडी , संजीवनी महाविद्यालय चापोली , विवेकानंद विद्यालय चापोली या शाळेचा समावेश आहे. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ , जुक्टा संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे , राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर चामे , चाकुर तालुकाध्यक्ष प्रा. दयानंद झांबरे , सचिव मधुकर कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष अलीम शेख , तालुका कार्याध्यक्ष अब्दुलवहाब जागीरदार ,तालुका उपाध्यक्ष भगवान खडके उपस्थित होते.शिक्षक दरबार कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रा.दयानंद झांबरे यांनी केले. सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.वैजनाथ सुरनर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चाकूर तालुका राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रा. वैजनाथ सुरनर यांचा सत्कार
चाकूर तालुक्यातील झरी येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. वैजनाथ सुरनर लिखित होलार समाज परिवर्तनाची दिशा या पुस्तकास सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचा अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.सुरनर यांचा आ. विक्रम काळे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या*