रोजगार हमी योजनेतील कर्मचा-यांना वेतनवाढ देवून सेवा हमीचे संरक्षण द्यावे..
किनवट:-(प्रतिनिधी)
राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना राज्य नियामक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार मानधनवाढ देवून योजना असेपर्यंत कार्यरत ठेवण्याची हमी देवून या कर्मचा-यांना संरक्षण द्यावे अशी मागणी आ. केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात ग्रामीण रोजगार हमी योजना ही वर्षानुवर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाची भुमिका बजावत असून या योजनेअंतर्गत जवळपास ८ ते १४ वर्षांपासून यात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी अत्यंत कमी मानधनावर कार्यरत आहेत. तथापि अत्यल्प कमी मानधनावर हे कर्मचारी तंतोतंत रोहयो कामांची अंमलबजावणी करीत असून रोहयो राज्य निधी असोशियनच्या राज्य नियामक मंडळाच्या दि. २७ ऑगस्ट २०१९ रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांना सन २०१९ नंतर पुढील अनुभवाच्या वाढीव टप्प्यानुसार अद्यापही मानदन वाढ देण्यात आली नाही.
तर मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व त्याचबरोबर मा. उच्च न्यायालय गुजरात (अहमदाबाद) यांनी दिलेल्या निर्णयानुसार कृषी विभागातील ‘आत्मा’ कर्मचा-यांना योजना असेपर्यंत कार्यरत ठेवण्यासाठी संरक्षण देण्याचे नमूद करून या कंत्राटी कर्मचा-यांना संरक्षण दिले आहे. तथापि मागील अनेक वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी काम करत असून त्यांच्या मानधनात वाढ करणे हे अत्यंत गरजेचे आहे. करीता राज्य नियामक मंडळाच्या दि २७ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार राज्यातील अत्यंत कमी मानधनावर कार्यरत असलेल्या रोहयो कर्मचा-यांना सन २०१९ नंतर अनुभव वाढीच्या टप्प्यानुसार तातडीने मानधन वाढ देण्यात यावी अशी मागमी किनवट माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रातून मागणी केली आहे.