मौजे बोधडी बु. येथे होत असलेले सुमारे २ कोटी रुपयाचे पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस : बोधडी पंचायत समिती सदस्या श्रीमती सत्यभामाबाई गोविंदराव मुंडे यांची तक्रार
किनवट ता.प्र दि २० मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत किनवट तालुक्यातील मौजे बोधडी बु. येथे होत असलेले सुमारे २ कोटी रुपयाचे पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस होत असल्याची तक्रार बोधडी पंचायत समिती गणाच्या सदस्या श्रीमती सत्यभामाबाई गोविंदराव मुंडे यांनी दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दिलेल्या निवेदनात श्रीमती सत्यभामाबाई मुंडे यांनी नमुद केले आहे कि त्यांच्या मतदारसंघातील सदर पाणीपुरवठा योजना हि गावातील नागरीकांकरिता अत्यंत आवश्यक असुन ती वर्षानुवर्षे गावातील नागरीकांना उपयोगी पडणार आहे परंतु सदर योजनेचे काम जर निकृष्ठ झाले तर त्याचे भुर्दंड पाणीटंचाईच्या स्वरुपात गावक-यांना भोगावे लागणार आहे. त्यामुळे सदर योजनेचे काम चोख व्हावे व या कामाचे गुत्तेदार मे.गजानन मुंडे कन्संट्रक्शन मु.पो.घाटनांदुर ता.गंगाखेड जि.परभणी यांच्याकडुन निकृष्ठ साहित्याचा वापर होत असल्याने गावातील पाणीपुरवठा योजना निकामी होऊन गावक-यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे होत असलेले काम चांगल्याप्रकारे व्हावे हि पंचायत समिती सदस्या श्रीमती सत्यभामाबाई मुंडे यांची मागणी असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनातुन निदर्शनास येत आहे.