किनवट टुडे न्यूज नेटवर्क । शासननिर्णयान्वये सेवा ज्येष्ठेतेनुसार बदलीने पदस्थापन देऊनही पेसा अंतर्गत तालुक्यात रुजू न झाल्याने तीन माध्यमिक शिक्षकांना गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी निलंबित केले आहे. यामुळे मनमानी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या तरतूदीनुसार नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्रा.) अंतर्गत माध्यमिक शिक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करुन त्यातील बदली पात्र कर्मचाऱ्यांचे दिनांक ३०.०७.२०२१ रोजी समुपदेशनात त्यांच्याकडून विकल्प घेवून त्यांच्या मागणी व विनंतीप्रमाणे किनवट तालुक्यातील रिक्त पदावर जा. क्र. ३५०९ अन्वये प्रशासकीय बदलीने पदस्थापना दिली. याच आदेशान्वये बदलीचे ठिकाणी रुजू होण्यास कार्यमुक्तही केले.
परंतु पेसा क्षेत्रातील रिक्त पदावर रूजू होणे आवश्यक असतांना विद्या कोंडीबाराव खानसोळे (जि.प.हा. शिवणी ), बालाजी गंगाराम बोन्लावार ( जि.प.हा. मांडवी) व माधव बळीराव जाधव (जि.प. हा. ईस्लापूर ) हे माध्यमिक शिक्षक कंसात दर्शविलेल्या शाळेत उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प. नांदेड व गट शिक्षणाधिकारी, पं. स.,किनवट यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या होत्या. तरीही त्यांनी विहित मुदतीत खुलासा सादर केला नाही.
वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना व शासन निर्णयाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (१९६७) व महाराष्ट्र सेवा ( शिस्त अपिल नियम १९६४ ) नुसार जिल्हा परिषद सेवेतील माध्यमिक शिक्षक विद्या कोंडीबाराव खानसोळे (जि.प.हा. इस्लापूर ), बालाजी गंगाराम बोन्लावार ( जि.प.हा. कोसमेट) व माधव बळीराव जाधव (जि.प. हा. ईस्लापूर ) यांना जा.क्र. १०७२ आदेशान्वये दि. १२ नोव्हेंबर रोजी निलंबित केले असून निलंबन काळात त्यांच्या नावासमोर दर्शविलेली शाळा त्यांचे मुख्यालय असेल असे आदेशात नमूद केले आहे.
शासनादेश व वरिष्ठांचे आदेश न जुमानता मनमानी करून पेसा क्षेत्रात रिक्त पदाचा अनुशेष भरण्यास आडकाठी आणली. त्यामुळे त्यांना निलंबीत केले असल्याने तालुक्यातील इतरही मनमौजी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
444 Views