एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत सीटूची मध्यवर्ती बस स्थानकात तीव्र निदर्शने
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.15.सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये दि. १४ नोव्हेंबर रोजी तीव्र निदर्शने केली आहेत.
राज्य सरकारच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांचे, रापम चे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवा शर्ती लागू कराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन दिवाळी पूर्वीपासून बेमुद्दत संप व एसटीच्या प्रत्येक कार्यालया समोर आंदोलन सुरू आहे.त्या आंदोलनास सीटू कामगार संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपाच्या पहिल्या दिवसापासूनच सक्रिय पाठिंबा दिला आहे व राज्यात काही ठिकाणी आंदोलने देखील केली आहेत.
परंतु राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती दाखविली नाही किंबहुना अनेक कर्मचाऱ्यांना निलंबन व वेगवेगळ्या कारवाईचा बडगा ऊगारून कारवाई करण्याचा बेकायदेशीर सपाटा लावला आहे. त्यास विरोध म्हणून दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी सीटूच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.त्याचाच भाग म्हणून सकाळी ११.०० वाजता नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथ तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली आहेत.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार व सीटू राज्य सचिव कॉ.विनोद निकोले यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने समर्थनार्थ मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व परिवहन मंत्री ना.अनिल परब यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त असलेल्या मागण्या तातडीने सोडवून सामान्य जनतेची होणारी प्रवासाची अडचण सोडवावी अशी मागणी केली आहे.
महा विकास आघाडी सरकारने एसटी कामगारांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करावा व कर्मचाऱ्यांवरील निलंबनासह सर्व कारवाया मागे घ्याव्यात व आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वारसांना पन्नास लाख रूपये राज्य शासनाने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी सिटू च्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत.
राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी एसटी महामंडळ राज्य शासनात सामावून घ्यावे या मागणीसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. महामंडळाने (सरकारने) त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. तरीही एसटी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
या आंदोलनाला भाजपासह काही राजकीय पक्ष राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत असून कामगार मात्र सावध भूमिका घेत आहेत.आता हे आंदोलन कुठल्याही एसटी कर्मचारी संघटनेचे राहीले नसून कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नांदेड जिल्हा सीटूने यापूर्वी देखील विभागीय नियंत्रक कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक नांदेड येथे भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
राज्य सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे संपाची तीव्रता वाढत आहे व सामान्य जनतेलाही हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे व महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे. हे महामानवांचा व संतांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या निश्चितच हिताचे नाही.
एस टी कर्मचाऱ्यांवर प्रदीर्घ काळापासून अन्याय व भेदभाव सुरू आहे. त्याचे निराकरण करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली पाहिजे अशी सीटूची मागणी आहे.
या पुढील होणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सीटू सोबत राहणार असून वेळ प्रसंगी जेलभरो करण्यात येईल असे मत जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे यांनी व्यक्त केले आहे.
आंदोलनाचे नेतृत्वकॉ.विजय गाभणे, कॉ.उज्वला पडलवार,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.अरूण दगडू,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.रफिक पाशा शेख,कॉ.मगादूम पाशा,कॉ.जयराज गायकवाड,कॉ.कपील गायकवाड,कॉ.साहेबराव गजभारे,कॉ.संतोष बोराळकर आदींनी केले आहे.उद्या दि. १५ नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबातील लोकांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे त्या मोर्चामध्ये सीटूचे अनेक कार्यकर्ते सहभागी होऊन पाठिंबा देणार आहेत.