पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे शासनाने लक्ष देण्यात यावे याकरिता दिनांक १ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पंकज वानखडे व राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यूट्यूब चॅनल आणि न्यूज पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करण्यात याव्यात. आज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात यूट्यूब चॅनल आणि पोर्टल सुरू आहेत. राज्यातील सर्व तालुक्याचा हिशोब करता महाराष्ट्र राज्यात १७५० चॅनल व पोर्टल कार्यरत आहेत. यातील अनेक चॅनलकडे एक लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत. या सर्व युट्यूब चॅनलला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणे जाहिराती देण्यात याव्यात. पत्रकारिता क्षेत्रात नव्या दमाचे पत्रकार असले तरी स्वतःच्या खिशाला कात्री लावून पत्रकारिता करीत आहेत. त्यांना शासनाने आज आधार देण्याची गरज आहे. आर. एन. आय. प्रमाणे युट्यूब चॅनेल्ससाठी स्वतंत्र नोंदनी व्यवस्था तयार करून या माध्यमांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. त्याचप्रमाणे आज पावेतो महाराष्ट्रातील पत्रकारांना माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सहकाऱ्यांमुळे मानाचे स्थान मिळाले आहे. परंतु ग्रामीण पत्रकार युट्युब चॅनेल तसेच पोर्टल पत्रकार यांची परिस्थिती हलाखीची व अत्यंत नाजूक असून या दुर्बल पत्रकारांकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांना शासकीय बैठकांना आमंत्रित करावे,(प्रेस कॉन्फरन्स) आर्थिक दुर्बल घटकात मोडणार्या ग्रामीण पत्रकारांना शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर पत्रकार भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे, यूट्यूब चॅनल व पोर्टल करिता सरकारी जाहिराती सुरू कराव्यात, पत्रकारांना मानधन लागू करण्यात यावे, पत्रकारांना टोल माफ करण्यात यावे, पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रकाराचा दर्जा देण्यात यावा, सर्व शासकीय निमशासकीय समित्यांवर पत्रकारांची नियुक्ती करण्यात यावी, शासकीय पुरस्काराकरिता पत्रकारांना नाम निर्देशित करण्यात यावेत, आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवेदनावावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखडे व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या सह्या आहेत.