पुराचे पाणी ओसरताच बोधडी खुर्द येथिल नाल्यात अवैध रेतीच्या उपसा करुन लांबवण्यावर चढाओढ
बोधडी — पुराचे पाणी ओसरताच बोधडी खुर्द येथिल नाल्यात अवैध रेतीच्या उपसा करुन लांबवण्यावर चढाओढ लागली आहे. “ना लिलाव ना राॅयल्टी” फुकटची रेती चार हजार रुपये ब्रास प्रमाणे विक्री केली जाते. यात तलाठी व मंडळ अधिका-याचे हात बरबटले असल्याने रेतीमाफियांचा खुल्लेआम धुमाकूळ चालु असून सामान्य नागरीक वैतागला असल्याचे समजते.
बोधडी खुर्द गावाला लागूनच मोठा नाला आहे. परवाच्या महापुराने थैमान घालून नाल्याकाठच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी आपापल्या सज्जावर राहून परिस्थितीवर लक्ष ठेऊन प्रशासनाला माहिती देणे तलाठी कदम महाशयांना गरजेचे वाटत नसून ते नांदेडला असल्याचे समजते. पुराचे पाणी आणखी बरोबर ओसरलेही नाही. गढूळ पाणी असतांना अवैध रेती लांबवणा-यांची चिक्कार गर्दी झाली आहे. तलाठ्यांच्या मुकसंमतीने अवैध रेतीचा उपसा आणि विनापरवाना वाहतूक बोखाळली आहे.
येथिल ग्रामस्थांनी तलाठी कदमास फोनवरुन माहिती दिल्यानंतर नांदेडला असल्याचे सांगून बरबटलेल्या हातांचे दर्शन घडऊन दिले. तहसिलदार यु.एन.कागणेंनी पूर परिस्थिती दरम्यान ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याच्या निर्देशाचे पत्र गटविकास अधिका-यांना दिले. मग बोधडीच्या तलाठ्याने मुख्यालयाला दांडी मारली. त्याचवेळी अवैध रेतीचा उपसा होऊन भरधाव वेगाने पळवणा-या ट्रॅक्टरला सामान्य ग्रामस्थ वैतागले असल्याचे सांगितले. यावर तहसिलदार कोणती कार्यवाही करणार, की तलाठ्यांना मुख्यालयी राहाणे आणि अवैध रेतीचे कुरण हे त्यांच्यासाठी शिथील केले की काय असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.