सामाजिक आणि शैक्षणिक अभिसरणाच्या चळवळीत क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे मोठे योगदान..डॉ. बालाजी पेनुरकर यांचे प्रतिपादन..
*नांदेड :सामाजिक समतेचे पुजारी आणि स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक समतेच्या लढाईला क्रांतिवीर लहुजी साळवे यांनी मोठे बळ दिले असून सामाजिक आणि शैक्षणिक अभिसरणाच्या या चळवळीत क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता आणि प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर बालाजी पेनुरकर यांनी केले.
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ‘लसाकम’ जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने दि.26 ला आयोजित आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांची २२९ जयंती आणि संविधान दिनानिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखांब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. एम.एच. त्रिभुवन, ‘लसाकम’चे राज्य महासचिव गुणवंत काळे, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक तथा राज्य कोषाध्यक्ष डी. एम. तपासकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुग्रीवजी अंधारे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के, उद्योग विभागाचे निरीक्षक शिवाजी कासारकर, राज्य प्रवक्ता चंद्रकांत मेकाले मराठवाडा उपाध्यक्ष मल्हारराव तोटरे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे सेनेच्या युवती पदाधिकारी कुंभारे ताई आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. पेनुरकर म्हणाले की क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ‘लसाकम’ ही कर्मचाऱ्यांची चळवळ मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीचा कणा असून या चळवळीने समाजाला दिशा देण्याचे काम करण्याची गरज असून या चळवळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करून संघटनेच्या वाटचालीविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी डी.एम. तपासकर, चंद्रकांत मेकाले, मल्हारराव तोटरे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना ‘लसाकम’चे जिल्हाध्यक्ष विजय रणखांब यांनी ‘लसाकम’च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अनेकाविध उपक्रमाची माहिती देऊन कोणतीही संघटना समाजाच्या उत्थानाचे काम करत असताना समाज त्याची निश्चितपणे नोंद घेत असून आज समाजातील अनेक दानशूर कर्मचाऱ्यांनी’लसाकम’च्या वेगवेगळ्या सामाजिक दायित्व जपणाऱ्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत आपले योगदान सिद्ध केले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यापीठ स्तरावरील गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘लसाकम’चे जिल्हा सचिव पी.एम. सूर्यवंशी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सन्माननीय सदस्य शिवा कांबळे आणि समितीच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या आठ खंडाचे नुकतेच प्रकाशन केल्याबद्दल दोघांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात समाजातील अनेक सामाजिक संघटनांचे संघटना प्रमुख आणि समाजातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव पी.एम. सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन जिल्हा संघटक बालाजी गवाले यांनी केले, कार्यक्रमाचे आभार जिल्हा उपाध्यक्ष एम.के घोडजकर यांनी मांडले.यावेळी २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.एम.सूर्यवंशी, एम.के.घोडजकर, चंद्रकांत भांडवले, शिवाजी मोरे, डी.आर. गायकवाड, सुनील कांबळे, आकाश टोमके, बालाजी गवाले आणि सोनू दरेगावकर आदींनी परिश्रम घेतले.
—