किनवट: साखळी उपोषणाच्या ९ व्या दिवशी भव्य रॅली व पोवाड्याच्या कार्यक्रमाणे उपोषणाचा समारोप
किनवट (तालुका प्रतिनिधी) : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ किनवट येथील जिजामाता चौकात सुरू असलेले साखळी उपोषण ९ व्या दिवशी ३नोव्हेंबर रोजी मागे घेण्यात आले असून भव्य रॅली व पोवाड्याच्या कार्यक्रमाणे उपोषनाचा समारोप करण्यात आला आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या आवाहनानुसार २ जानेवारी नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ किनवट येथील जिजामाता चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मागील ९ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. दि.२ नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर किनवट येथील तीन दिवसापासून सुरु असलेले आमरण उपोषण तहसीलदार मृणाल जाधव व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. तर साखळी उपोषनाच्या अनुषंगाने दि. ३ नोव्हेंबर रोजी मारेगाव (खालचे) व लक्कडकोट येथील शेकडो महिला व पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता चौकापर्यंत भव्य रॅली काढली तर उपोषण स्थळी शिवशाहीर गजानन जाधव यांचा पोवाड्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ४ वा. साखळी उपोषणाचाही समारोप करण्यात आला. दरम्यान गोकुळ नगर, गणेशपूर व सारखनी येथील आमरण उपोषणही मागे घेण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी रोजी पर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे जे निर्णय घेतील त्यानुसार पुढील आंदोलन करणार असल्याचे यावेळी सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.