पाणवन येथील मातंग महिलेस व निळा येथील मातंग युवकास मारहाण करणार्या आरोपींविरूद्ध मोक्का कायद्यांतर्गत कार्यवाही करा अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाची मागणी
नांदेड दि. 6 –
मौजे पाणवन ता. माण जि. सातारा येथील मातंग समाजातील महिला शाहिदा तुपे यांना भररस्त्यात/चौकात बेशुद्ध होईपर्यंत व बेशुद्ध झाल्यावरही झालेली मारहाण आणि एका महिलेवर झालेला सामुहिक हल्ला प्रकरणी सवर्ण समाजातील आरोपीविरूद्ध कठोर कार्यवाहीचे निर्देश द्यावेत. तसेच मौजे निळा ता.जि. नांदेड येथील मातंग युवक लखन रामा खंदारे यांचेवर सवर्ण मराठा जातीयवादी मंडळींकडून झालेल्या खुणीहल्ला प्रकरणीही या आरोपींविरूद्ध मोक्का कायद्यांतर्गत कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या घटना पाहता महाराष्ट्र हादरत आहे, महाराष्ट्रातील दलित समाजात प्रचंड दहशत व भीतीचे वातवरण याच पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयद्वेषी, अत्याचारी मंडळींकडून निर्माण झाले आहे. राज्यात दलित, मातंग सुरक्षित नाहीत, अतिशय क्रूर घटना एकामागून एक महाराष्ट्रात घडत आहेत. राज्यातील शासक सरकार व त्यांची पोलीस यंत्रणा दलितांना सुरक्षिततेची हमी देणार की नाही? दलितांचे होणारे हत्याकांड तुम्ही गंभीरपणे घेणार की नाही? दलितांच्या हत्यांची मालिका कधी थांबवणार? असा सवाल शासनास करून वरील व अशा निंदणीय, अमानवीय क्रूर घटनांचा अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन आणि विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच सकळ शोषित अत्याचारग्रस्त समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. वरील सर्व घटनांतील आरोपींविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही करावी. वरील घटनांचा तपास हा निःपक्ष व जलदगतीने पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून किंवा सीआयडीमार्फतच चौकशी पूर्ण करण्यात यावी. पाणवन ता. माण येथील शाहिदा तुपे व मौजे निळा ता.जि. नांदेड येथील मातंग युवक लखन खंदारे यांच्या मारहाणीचे खटले अनुभव असणार्या तज्ज्ञ विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले.
यावेळी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, राज्य सचिव शिवाजीराव नुरूंदे, मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर, निलेश तादलापूरकर, मानवी हक्क अभियानाचे मच्छिंद्रभाऊ गवाले, सामाजिक कार्यकर्ते राहुल तेलंग, एन.डी. रोडे, कॉ. दिबंगर घायाळे, अॅड. विष्णू गोडबोले, देवीदास लिंगायत, माजी सैनिक यादवराव वाघमारे, शशिकांत तादलापूरकर, नागेश तादलापूरकर, प्रा. देवीदास इंगळे, शंकरराव गायकवाड, संतोष पारधे, यादव गाडे, आनंद वंजारे, गौतम शिरसाठ, रमेश सूर्यवंशी, शिवाजी सोनटक्के, इंजि. एस.पी. राखे, महादेव कसबे, चंद्रभान सूर्यवंशी, उत्तमराव वाघमारे, सुरेश कांबळे, विठ्ठलराव सूर्यवंशी, जयवंतराव वाघमारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
(सतीश कावडे)
अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन नांदेड.