पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचा अवमान करणार्यांवर कडक कार्यवाही करावी विविध सामाजिक संघटनांची मागणी
नांदेड दि. 31 –
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील थोर राष्ट्रीय लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून अवहेलना करणे ही जाणीवपूर्वक करण्यात आलेली कृती आहे आणि ही निंदनीय कृती केवळ हिंदुत्ववादी सावरकर यांचे उदात्तीकरण करण्यासाठीच केलेली आहे, त्यामुळे अशी कृती करणार्यांवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
या प्रकरणी सरकारच्या वतीने निव्वळ दिलगिरी व्यक्त करून न थांबता, अशा समाजकंठकी प्रवृत्तीचा पायबंद करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. वीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी म्हणून सरकारच्या वतीने महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात सन्मानपूर्वक उभारण्यात आलेले या राष्ट्रीय लोकमातांची पुतळे अवमानकरित्या हटवून सावरकरांच्या जयंतीचा घाट घालत उघडपणे पुतळ्यांची अवहेलना व अवमान केलेला आहे. तसेच दि. 30 मे रोजी ’इंडिका टेल्स’ या वेबसाईटवरून स्त्रीशिक्षणाच्या जननी, थोर समाजसेविका राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून या थोर राष्ट्रमातेची जाणीवपूर्वक महाराष्ट्रात बदनामी करण्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या सुकन्या सावित्रीबाई फुले यांच्या थोर कार्याला कलंकित करणारी आहे.
वरील दोन्ही घटनांची शासनामार्फत सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करावी, अन्यथा आपल्या सरकारचा अशा समाजकंठकी व राष्ट्रविरूद्धी प्रवृत्तीच्या लोकांच्या कृतीला अप्रत्यक्ष छुपा पाठिंबा व समर्थन आहे, ही धारणा पक्की करून महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला.
सदरील घटनेचा आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवित शिष्टमंडळाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे वरीलप्रमाणे मागणी करण्यात आलेली आहे. या शिष्टमंडळात अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे, मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर, समता ग्रुपचे प्रमुख इंजि. एस.पी. राके, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद थोटवे, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे एन.डी. रोडे, विठ्ठल घाटे, नागराज आईलवार, आनंद वंजारे, शिवाजी नुरूंदे, नागेश तादलापूरकर, सोनाजी कांबळे आदींची उपस्थिती होती.