शासकीय नर्सिंग कॉलेजची मयत विद्यार्थीनी कु.प्रजापती लांडगेच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर करावाई करा
*पीडितेच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गृहमंत्री, जिल्हाधिकारी आणि माकप आमदार कॉ.विनोद निकोलेना निवेदन*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.24.चुकीच्या औषध उपचाराने नांदेड येथे जीएनएमचे शिक्षण घेणारी विद्यार्थीनी प्रजापती लांडगे हिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केल्यामुळे व तीन दिवस मृतदेह ताब्यात घेतला नसल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
विविध सामाजिक संघटना आणि दलित पुढारी दोषींवर कारवाई करून पीडिताच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे ही मागणी करीत आहेत.
नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी मा. पी.एस.बोरगावकर यांनी प्रकरण योग्यरित्या हाताळून आंदोलक आणि नातेवाईकांना विश्वासात घेऊन दि.२२ मे रोजी अंत्यविधी करण्यात आला.
त्या प्रकरणात योग्य कारवाई व्हावी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नांदेड आणि डहाणू – पालघर मतदार संघाचे माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांना निवेदन देऊन प्रजापती लांडगे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनद्वारे केली आहे.
उपरोक्त प्रकरणाच्या अनुषंगाने कॉ.गंगाधर गायकवाड आणि कॉ.उज्वला पडलवार हे माकप राज्य कमिटी आणि आमदार कॉ.निकोले यांच्या सतत संपर्कात असून अखंड पाठपुरावा सुरु आहे.
मयत विद्यार्थीनी ही अनुसूचित जातीची असून अनुसूचित जाती – जमाती कायदा १९८९ प्रमाणे कारवाई करून महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने पीडितेच्या कुटुंबियांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे.
निवेदनावर कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.कांताबाई तारू,कॉ. मीना आरसे, कॉ.पवन जगदमवाड आदींच्या सह्या आहेत.
अशी माहिती कॉ.गंगाधर गायकवाड
सचिव -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,नांदेड.यांनी आमच्या प्रतिनिधीना दिली आहे.