मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात काँग्रेस करणार विविध कार्यक्रमांचे आयोजन ,मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष
नांदेड, दि. २ मे २०२३:
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय आज मुंबई येथील एका बैठकीत घेण्यात आला. हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थापन केलेल्या गौरव समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्राम हा सर्वांसाठी आस्थेचा विषय आहे. मुक्तिसंग्रामाचे ७५ वे वर्ष साजरे करण्याबाबत राज्य सरकार उदासीन असले तरी मराठवाड्याचे नागरिक आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या नात्याने आपण आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुढील मुक्तिसंग्राम दिनापर्यंत विविध कार्यक्रमांची आखणी करताना समाजातील विविध घटक त्यामध्ये सहभागी होतील, असे नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संभवतः छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेऊन कार्यक्रमांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी समितीचे समन्वयक व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन व पाठपुरावा करून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा निर्णय करून घेतला. मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर राज्य सरकारला या ऐतिहासिक वर्षाचा जणू विसरच पडला आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अनिल पटेल, कल्याण काळे, रवींद्र दळवी, तुकाराम रेंगे पाटील, भाऊराव पाटील गोरेगावकर, राजाभाऊ देशमुख, विलास औताडे, अमरनाथ राजूरकर, शेख युसुफ, दिलीपराव देसाई, राजेसाहेब देशमुख, धीरज कदम पाटील आदींनी आपली मते मांडली.