जंगलात लागलेल्या आगीची खासदार हेमंत पाटील यांनी घेतली दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आगीची माहिती दिली
नांदेड दि.१ : किनवट ,माहूर,महागाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जंगलात एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेली आग पाहून खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ आपली गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन आगीच्या भीषणतेची पाहणी केली व तात्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची दाहकता लक्षात आणून दिली. तसेच वनविभागाशी संपर्क साधून तात्काळ आग आटोक्यात आणण्यात यावी अश्या सूचना दिल्या.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलामध्ये वणवा लागून वनसंपदा जळण्याचे प्रमाण खूप मोठे असते . यामुळे जंगलातील झाडे झुडपे आणि मोठे वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन मोठी हानी होते तसेच वन्यप्राण्याच्या जीवाला सुद्धा धोका होतो. अनेक ठिकाणी वन्यप्राणी मृत्यू पावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. जंगल वन आणि त्यामधील संपदा हीच आपली संपत्ती आहे. ती आपण जपली पाहिजे. खासदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट माहूर आणि महागाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्याना किनवट- माहूर रस्त्यावर रात्रीच्या वेळी जंगलात एके ठिकाणी आग लागून नुकसान होत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ गाडी बाजूला घेऊन त्या भागाची पाहणी केली. राज्याचे वनमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व परिस्थितीची दाहकता लक्षात आणून दिली. आणि संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क साधून तात्काळ आग आटोक्यात आणावी अश्या सूचना केल्या . अन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत खबरदारी घ्यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.
जंगलामध्ये लागलेल्या आगीमुळे केवळ जंगलाचे नुकसान होते असे नाही अनेकदा जंगलाला लागून असलेल्या शेत आणि गावांना सुद्धा याचा मोठा धोका असतो वन्य प्राण्यांबरोबरच शेतकऱ्यांची गोठ्यातील जनावरे सुद्धा भक्ष्यस्थानी पडत असतात. त्यामुळे जंगलात लागलेल्या आगीची दाहकता केवळ जंगलापुरती मर्यादित न राहता ती शेतकरी आणि गावकरी यांना सुद्धा नुकसान देत असते. परंतु अश्या घटनांकडे वन विभाग गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करत असते . तर अनेक ठिकाणी शेतकरी गावकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणत असतात. त्यामुळे वन विभागाने यावर ठोस पावले उचलून आग आटोक्यात आणण्यासाठी आणि अश्या घटना घडू नयेत याकरिता उपाय करावेत असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले