माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मागणीला रेल्वेमंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद ; १३ फेब्रुवारी पासून देवगिरीला एलएचबी डब्बे जोडणार
नांदेड, दि.४- सिकंदराबाद-मुंबई -सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसचे डव्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. या किंवा मराठवाड्यातून धावणाऱ्या अन्य गाड्यांची हीच अवस्था आहे. त्यामुळे या गाड्यांचे जुने डबे बदलून नवीन बसविण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कांही दिवसापूर्वी केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे विभागाने १३ फेब्रुवारीपासून देवगिरीचे सर्व जुने डब्बे काढून टाकून त्या ठिकाणी नवे सर्व सुविधायुक्त एलएचबी डब्बे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
कांही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निमंत्रीत केले होते. या संमेलनात मराठवाड्याच्या विकासात राजकिय नेतृत्वाकडून अपेक्षा या विषयावर बोलतांना मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप सांगतानाच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अनेक विषयांवर त्यांच्या भाषणातून प्रकाश टाकला होता.
विकासाचा धागा पकडत त्यांनी केंद्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या मराठवाड्यातील रावसाहेब दानवे व भागवत कराड यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु तूर्त देवगिरी एक्सप्रेससह मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डब्बे बदलून नवीन डब्बे द्यावेत अशी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे विभागास देवगिरीचे डब्बे बदलण्याचे आदेश दिले. त्याची अमलबजावणी १३ फेब्रुवारीपासून करन्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना स्वतः फोन करून ही माहिती सांगीतली.
१३ फेब्रुवारीपासून हे नवीन डब्बे जोडण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना देवगिरी एक्सप्रेस मध्ये चांगल्या सुविधा मिळणार आहेत. परंतु इतक्यावर न थांबता हा विभाग दक्षिण मध्य मधून तोडून मध्य रेल्वेशी जोडण्यासह मराठवाड्यातील रेल्वे संदर्भातील अन्य प्रश्नांना आता न्याय द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.