किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ममत्वाचे माहेर : मा. सूर्यकांताताई पाटील (विशेष लेख)

नांदेड:
उर्जस्वल, मातृहृदयी नेत्या.आमच्या भाग्यविधात्या.. देशाच्या माजी केंद्रीय ग्रामीण विकास व सांसदीय कार्य राज्यमंत्री मा.सूर्यकांताताई पाटील ७३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत…त्यानिमित्ताने..

माणसाचं चांगुलपण हे अनेकांच्या बहुमुखी मान्यतेतून निश्चित होत असते. कलदार माणसांच्या भोवती लोकमान्यतेचे अभंग कवच तयार होत असते .आजच्या गतिमान जीवनात माणसं एवढी स्वकेंद्री बनत चालली आहेत की, त्यांना सामाजिक, सार्वजनिक कर्तव्य करण्याची गरजही वाटत नाही ; परंतु अशा अनास्थेने ग्रासलेल्या आणि आत्मीयता हरवलेल्या माणसांच्या गर्दीत आजही काही बोटांवर मोजण्याएवढी माणसं शिल्लक आहेत . जी कुठलाही गाजावाजा न करता, कोणताही वेगळा आव न आणता , झपाटून, स्वतःला झोकून देऊन , समाजसेवेचे कंकण हाती बांधून लोकहितासाठी समर्पित वृत्तीने काम करतात. अशा दुर्मिळ माणसांमध्ये ‘सत्ता’ आणि ‘पदा’पेक्षा ‘सत्य ‘ आणि ‘सेवे’ ला अधिक महत्त्व देणाऱ्या व नेहमीच इतरांप्रती आपल्या काळजामध्ये अपार करुणाभाव जपणाऱ्या मातृहृदयी सूर्यकांताताई पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने मला ‘ ममत्वाचं माहेर ‘ च वाटतात.

कर्तव्याशी इमान राखणारा माणूसच आपल्या जगण्यावर स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटविण्यात यशस्वी झालेला असतो . अशाच व्यक्ती आणि त्यांचे कार्य समाजासाठी आस्थेचा नि आदराचा विषय बनलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे सत्यसूर्याची आराधना करीत, निष्ठेच्या खडतर वाटेवर निर्धाराने चालताना सूर्यकांताताईंनी उभ्या आयुष्यात आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका तितकीच कणखरपणे निभावली आहे . मग नांदेड नगरपालिकेच्या नगरसेवकापासून ते आमदार , खासदार आणि पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा हा लांब पल्ल्याचा राजकीय प्रवास दैदिप्यमान असून, प्रेरणादायी आहे. या काळात त्यांनी अनेकविध महत्वाच्या समित्यांवर आणि मंडळांवर वेगवेगळी पदे भूषविली आहेत .या प्रवासात ताईंनी आपली पारदर्शकता कधीही मलीन होऊ दिली नाही.

आपल्याला मिळालेली सत्ता ही जनसेवेची सुसंधी समजून , राजकारणात काम करताना विकासाची दूरदृष्टी असलेल्या या लढवय्या नेत्यांने संघर्षाचे हत्यार घेऊन, जनतेचा प्रतिनिधी म्हणून अनेकदा लोकलढे उभारले. या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून, त्यांच्या पदरात विकासाभिमुख योजना व सवलतींचं दान टाकून राजसत्तेचा लोकहितासाठी वापर केला.

खरंतर ज्या काळात महिला राजकारणामध्ये उतरण्यास धजावत नव्हत्या अशा काळामध्ये मोठ्या हिमतीनं स्वतःची स्वतंत्र वाट तुडवत त्यांनी केलेली वाटचाल दिव्यत्वाबरोबर भव्यतेचीही प्रचिती देणारी आहे.

अनुवांशिकतेच्या नियमानुसार सद्गुणांचं संक्रमण होत असतं, असं म्हटलं जातं. त्यानुसार वडिलांकडून आलेला लढवय्या बाणा तसेच आई आणि आजोबांकडून मिळालेला ‘सेवा’ नि ‘समर्पणा’ चा समर्थ वारसा व वास्तवाला थेट भिडण्याची ताकद. त्यामुळे जनसामान्यांसाठी संगर उभा करताना ताईंनी कुणाचीही कसलिही भीडभाड ठेवली नाही.जे करायचं ते मनापासून करायचं, झोकून देऊन करायचं. हे करताना त्यांनी तत्वाचा कधीच त्याग केला नाही की , आपल्या विचारांशी कधी प्रतारणा केली नाही. शेवटपर्यंत ताईंनी कसदार, सत्त्वशील वृत्ती जोपासली.

आपल्या एकंदर राजकीय जीवनात त्यांनी समर्पित, इमानदार लोकप्रतिनिधीच्या प्रतिमेला जरासाही धक्का लागू दिला नाही. त्यामुळे आजही लोकमनामध्ये ताईचं तितकच आदरणीय स्थान आहे.

सडेतोड वृत्ती, स्पष्टवक्तेपणा व निर्भीडपणा हा त्यांचा बाणा .ऊर्जेचा अखंड स्त्रोत असलेल्या ताईंनी भारतीय राजकारणाच्या सारीपटावर आपल्या कार्यकर्तृत्वाची ‘सूर्य’मुद्रा उमटवली.

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी हैदराबाद मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेले वीर हुतात्मा जयवंतराव पाटील व मातोश्री अंजनाबाई यांची लेक. हा झाला त्यांचा कौटुंबिक परिचय; परंतु त्यांनी आपल्या आई -वडिलांकडून त्याग व समर्पणाचा समर्थ वारसा घेऊन, अंधारवाटा उजळून ,उजेडाशी सलगी केली. आणि स्वकर्तृत्वाने राजकारणाच्या भाळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली .

काम करण्याची अफाट ऊर्जा , जिज्ञासा व अभ्यासूवृत्ती, सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड आणि त्याच्या जोडीला असलेली विनयशीलता यामुळे त्यांचं जीवन अधिक कांतीमान बनत गेले.त्यांनी आपल्या एकूण कारकिर्दीत मोठ मोठी पदे उपभोगूनही राजकारणाच्या भाऊगर्दीत आपला मूळ चेहरा आणि काळजातली करुणा हरवू दिली नाही. हे त्यांचे मोठेपण आहे; परंतु आपण कोणीतरी मोठी व्यक्ती आहोत, इतरांसाठी आपण काहीतरी त्याग वगैरे करतो आहोत . याचा साधा लवलेशही त्यांना नाही. ताईंचं अत्यंत साधं नि सरळ वागणं कुणालाही हेवा वाटावा असंच आहे.

वैचारिक प्रगल्भता व झपाटलेपण हा त्यांनी जोपासलेला अभंग निधी आहे .

ज्या माणसाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. खूप काही सोसावं लागलं. खरं तर अशा माणसांच्या मनामध्ये इतरांविषयी कटुता येणं स्वाभाविक आहे. ताईंनी तर आयुष्यभर संघर्षाची यात्राच केली. या यात्रेत त्यांच्या वाट्याला अनेक कडू-गोड अनुभव आले ; पण ती अनुभूती देणाऱ्या व्यक्तींविषयी त्यांच्या मनात कटुते ऐवजी ‘करुणा’च जागी झाली.

वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी मग ती सामाजिक असो वा राजकीय. त्यांनी आपल्या कुटुंबाचा तोल संभाळूनअत्यंत निष्ठेने ती लीलया पार पाडली. डॉ.मृणालिनी व श्री विशाल या आपल्या पोटच्या दोन अपत्त्या बरोबरच ‘मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था’ या तिसऱ्या अपत्त्यावरही ताईंनी भरभरून प्रेम केले. ग्रामीण भागाचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याच्या पवित्र उद्देशाने उभारलेली ‘मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था’ आज गुणवत्ता संपन्न शैक्षणिक लेणी ठरली आहे.

काळाची पावलं ओळखून चालणारी माणसं स्वतःला अपडेट करत क्षणोक्षणी उत्क्रांत होत असतात .अशी उत्क्रांत होऊन उन्नत होत गेलेली माणसं तशी दुर्मिळच असतात. सूर्यकांताताई पाटील हे त्यापैकीच एक नाव.

वयाला बाजुला ठेवून जुन्या-नव्या पिढीशी सुसंवाद राखत बदलत्या काळाबरोबर अजूनही नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची त्यांची धडपड वाखानण्याजोगी आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे उत्क्रांत होणे सुरूच असते. आपल्या एकूण राजकीय जीवनामध्ये ताईंची ‘आई ‘ ही भूमिका मध्यवर्ती राहिलेली आहे. त्यानुषंगाने ताई ह्या खऱ्या अर्थाने मातृत्वाचे अनोखे नेतृत्व आहेत.

प्राप्त केलेल्या ज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकावं. आपल्या आवडीच्या प्रांतात मुशाफिरी करणं हा त्यांचा स्वभाव .मुळातच सहृदय रसिक असलेल्या ताईंनी नाटक पाहणं, वेगवेगळ्या विषयांवर कविता करणं असो की, स्वयंपाक .इत्यादी छंद त्यांनी आवडीने जोपासले. नागपूरला असताना घेतलेल्या होम सायन्स च्या शिक्षणाचा जीवनात पुरेपूर सदुपयोग केला. पदाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता ताईंनी आपल्या मुला-मुलिंसह त्यांच्या मित्र-मैत्रिणीना सुद्धा स्वतःच्या हाताने त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालण्याचा मनमुराद आनंद लुटला . हे त्यांचे विशेष असे वेगळेपण सांगता येईल.

जिज्ञासू ,अभ्यासू व कमालीचा मातृभाव असलेल्या या प्रतिभावान उर्जस्वल व्यक्तिमत्वाकडे जशी सहृदय रसिकता आहे तशीच वेदनेप्रतिची संवेदनशीलताही आहे .
म्हणूनच..
” जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना।
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना।
धमण्यातल्या रूधिरास या खल भेदण्याची आस दे।
सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे।”

जणू असेच पसायदान मागणाऱ्या सूर्यकांताताई या समाधानी आयुष्याची मालकीण आहेत .

आयुष्यातील आव्हानांना सडेतोड उत्तर देत आत्मतेजाने तळपणाऱ्या ताईंचे जीवनकार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहिला की ,आपल्याला
“दिव्यत्वाची जेथ प्रचिती ।
तेथे कर माझे जुळती ।”
याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही.

ही दिव्यता व भव्यतेची आपली पताका आसमंतात अशीच आजन्म फडकत राहो.या सदिच्छेसह …

आदरणीय ताई,
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच विधात्याच्या चरणी नम्र प्रार्थना. व वाढदिवसाच्या आपणास मनापासून भरभरून शुभेच्छा!

– डॉ.सूर्यप्रकाश जाधव,
हिमायतनगर.
मो. 9623836356.

161 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.