“हर घर तिरंगा” साठी जिल्ह्यातील 5 लाख नागरिकांचा मिळेल उत्स्फूर्त सहभाग – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 8 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांच्या मनात भारतीयत्वाची भावना वृद्धींगत व्हावी, नवीन पिढी पर्यंत स्वातंत्र्य लढ्याचे मोल पोहचावे या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात “हर घर तिरंगा” मोहीम प्रभावीपणे राबवू. यात जिल्ह्यातील सर्व स्थानिक संस्था, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था, महानगरपालिका, शैक्षणिक संस्था यांच्या सहभागातून या मोहिमेला जिल्ह्यातील 5 लाख लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
“हर घर तिरंगा” या अभिनव उपक्रमासाठी 11 ते 17 ऑगस्ट हा सप्ताह निर्धारीत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व घटकातून या अभिनव उपक्रमाला सहभाग मिळावा यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक समिती नियुक्त करून चालना दिली आहे. आज या उपक्रमासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व कापड व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आढावा घेण्यात आला.
“हर घर तिरंगा” उपक्रमाबाबत कृती आराखडा तयार करून प्रत्येक नागरिकांनी “हर घर तिरंगा” मध्ये घेतलेला सहभाग नोंदवला जावा यासाठी स्वतंत्र ॲपही विकसीत करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लोकांना आपल्या घराच्या पत्त्यासह आपला सहभाग अधोरेखीत करता येईल. harghartirangananded.in या लिंकवर सहज सोप्या पद्धतीने नागरिकांना आपला सहभाग शासन स्तरावर नोंदविणे शक्य आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑनलाईन नोंदणीसह तिरंगा उत्पादक, विक्रेते, जे लोक उत्स्फूर्त राष्ट्रध्वज दान देऊ इच्छितात अशा दात्यांची निवड केली जात आहे. 5 लाख राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील बचतगट, खाजगी उत्पादक, खादी भांडार, जेम, इंडिया मार्ट, ॲमेझॉन आदींशी समन्वय साधला जात आहे. ज्या इच्छुकांना गरीब घरांसाठी राष्ट्रध्वज दान करण्याची इच्छा आहे अशा व्यक्ती, संस्थांचीही यात मदत घेतली जाणार आहे. राष्ट्रध्वज विक्रीचे केंद्र लवकरच जाहीर करण्यात येईल. युवा वर्गांचा अधिकाधिक यात सहभाग व्हावा यासाठी लवकरच महाविद्यालयीन पातळीवर संवाद कार्यक्रमाचेही नियोजन केले जात असल्याचे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या उपक्रमाबाबत केलेल्या सादरीकरणाचा व स्वतंत्र विकसित करण्यात आलेला ॲपचा गौरव करण्यात आला.
000000