संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
माणगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांना पत्रकारिता क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी नुकताच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुडीपाडवा या मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला AS मराठी न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, AS मराठी न्यूजचे मुख्य संपादक अनंत खराडे, व्यवस्थापकीय संपादक सागर पवार, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, साईचे सरपंच हुसेन रहाटविलकर, नाभिक समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे, AS मराठी न्यूजचे पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारिता करीत असतांना पत्रकारांनी काय काळजी घ्यावी? पत्रकारितेचे नियम व आचारसंहिता याबद्दल मार्गदर्शन केले.
संघटनेचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी पत्रकारिता हे क्षेत्र म्हणावे तेव्हढे सोपे नसून यात मराठी शुद्धलेखन व मराठी व्याकरणाकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले. साईचे सरपंच हुसेन रहाटविलकर, नाभिक समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे यांनी समाजाचा विकास, उन्नती व कल्याण यासाठी पत्रकारिता करावी असे आवाहन केले व सर्व पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपादक अनंत खराडे व सागर पवार यांनी AS मराठी न्यूजच्या बातमीसाठी आम्ही नेहमी तत्पर राहून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पत्रकारिता करीत असल्याचे सांगितले.
यावेळी विलास यादव, सुदाम शिंदे, स्वप्नील ढवण उपसंपादक, संदेश चौधरी कोकण विभाग संपादक, मितेश महाले सहसंपादक, राकेश देशमुख, सुयोग जाधव, संतोष मोरे,अक्षय जाधव, अभिजीत ढाणीपकर, विवेक चाफेकर, नितेश पवार, जितेंद्र माळी या सर्व पत्रकारांना नियुक्ती पत्र व सन्मानपत्र देण्यात आले. डी. टी. आंबेगावे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.