ऊस रस यंत्रात साडीचा पदर अडकून गळ्याला बसला फास; महिलेचा जागीच मृत्यू* *कौठा भागातील रसवंती गृहावरील हृदयद्रावक घटना
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नविन नांदेड*:दि.16.ऊस रस यंत्रात साडीचा पदर अडकून गळ्याला बसला फास बसल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नवीन कौठा भागात घडली आहे.
शहराच्या नवीन कौठा भागातील ओम गार्डन लगत असलेल्या रसवंती गृह येथील चालक असलेली महिला ही रस काढत असतांनाच अचानक अंगावरील साडीचा पदर रस यंत्रात अडकला.यामुळे महिलेच्या गळ्याभोवती साडीचा फास आवळला गेला, यात या महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ऐन होळी सणांचा दिवशी घडली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओम गार्डन लगत असलेल्या संरक्षण भिंतीच्या जागेत दुर्गा नवनाथ खोडं (वय ३७) रा.आस्था सिटी, कौठा, नांदेड येथे वास्तव्यास असलेल्या महिलेचे हे रसवंती गृह आहे.आज दुपारी चारच्या सुमारास ऊसाचा रस काढण्यासाठी यंत्र चालु केले असतांना अचानक अंगावरील साडीचा पदर यंत्रात गेला आणि अंगावरील साडीने महिलेच्या गळ्याला फास आवळला गेला.
हा प्रकार लक्षात येताच या महिलेच्या पतीने तात्काळ यंत्राकडे धाव घेऊन पत्नीच्या गळ्याभोवती आवळला गेलेला साडीचा फास काढला; पण तोपर्यंत या महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ही माहिती कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राजु हुमनाबादे, बालाजी कोडांवार,गणपत पेदे चालक प्रकाश मुंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.
साडीचा पदर यंत्रात जाण्याचा हा प्रकार आणि महिलेचा मृत्यू हा सर्व प्रकार केवळ एका मिनिटातच घडला.ऐन होळीच्या दिवशी कष्टकरी महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता.
सदरील महिलेचे पती हे आस्था सिटी येथे वॉचमन म्हणून काम पाहतात.मृत महिलेच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया चालू होती.