अंत्यसंस्कारास विरोध होत असताना उपस्थित पोलीस व महसूल अधिकारी यांना सह आरोपी करावे – अँड.नितीन पोळ
कोपरगाव : अंत्यसंस्काररास उपस्थित असणाऱ्या पोलीस व महसुली अधिकारी यांना सह आरोपी करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी कोपरगाव येथील नायब तहसीलदार यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की ,बोरगाव ता माळशिरस येथील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे दि २० ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास गावगुंडांनी विरोध केला त्या बाबत पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या अधिकारी उपस्थितीत असताना देखील गावगुंडांनी साठे यांचा अंत्य विधी सार्वजनिक स्मशानभूमीत होऊ दिला नाही त्यामुळे गावातील लहू सैनिकांनी सदर अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोर केला
पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून हा अत्यंत निंदनीय प्रकार असून या घटनेचा कोपरगाव तालुका मातंग समाज ,दलित,अधिवासी व मुस्लिम संघटनाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी , पोलीस व महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाला तरी हे अधिकारी गप्प होते त्यामुळे या अधिकाऱ्यांना सह आरोपी करावे ,पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावे व भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रत्येक गावात सरपंच,पोलीस पाटील, व महसुली अधिकारी यांची कमिटी स्थापन करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली
या निवेदनावर लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ, सोमनाथ म्हस्के,संपत चंदनशिव, गौतम बनसोडे, जितेंद्र रानशूर, शंकर बिऱ्हाडे, अजय विघे,निसार शेख, विनोद वाकळे,विशाल आव्हाड, संजय ससाणे, रोहिदास पाखरे आदींच्या सह्या आहे