पवार-आंबेडकर भेट हा शुभ संकेतः अशोक चव्हाण
नांदेड, दि. २१ ऑक्टोबर २०२३:
आज मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
सदर भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, माझी व्यक्तीगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले; जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत, अशी आपली इच्छा असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.