सेवा सहकारी सोसायटी निवडणूक विजयाचा ट्रेंड आगामी निवडणुकातही कायम ठेवा -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
नांदेड दि. १९ टीम वर्क व सूक्ष्म नियोजना मुळे कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत चांगले यश मिळाले असेच यश आगामी स्थानिक स्वराज्य ,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कायम ठेवा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
येथील आयटीएम सभागृहात बुधवार दि. १९ एप्रिल रोजी कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीतील विजयी सर्वच १३ उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते व्यासपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. अमरनाथ राजूरकर, आ. जितेश अंतापूरकर,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा ,जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगांवकर ,माजी उपमहापौर आनंद चव्हाण ,सुरजीतसिघ गिल , काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे प्रमुख साईनाथ उत्तरवार व माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा नावलौकिक आहे. आपण अनेकदा सेवा सहकारी सोसायटीला भेट दिली आहे. या सोसायटीच्या माध्यमातुन सभासद ,शेतकऱ्यांचे हित जपले पाहिजे त्यांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न विधानसभेत मांडला याबाबत सहकारमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे अद्याप निर्णय झाला नसला तरी शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न आगामी काळात मार्गी लागावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन त्यांनी दिले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून नांदेड,बिलोली,देगलूरसह जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले ,रस्त्यांची कामे केली उर्वरित कामासाठीही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीतील यशाने वातावरण निर्मिती झाली आहे. यासाठी सर्वांनी आता पासूनच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा आगामी स्थानिक स्वराज्य ,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयाचा ट्रेंड कायम ठेवा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की,आपल्या भागाचा जिल्ह्याचाच काय मराठवाड्याचा विकास अशोकराव चव्हाणच करू शकतात त्यांच्यात ती क्षमता व अभ्यास आहे. यामुळे कायमच जिल्हावासीय त्याच्या पाठीशी भक्कम पणाने उभे आहेत यामुळेच जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असो विजय काँग्रेस उमेदवाराचाच होतो. महापालिका,नगरपालिका व जिल्हापरिषदेतही काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीतील विजया नंतर आता आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा विजय आपलाच होईल असा विश्वास माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला आहे.