किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आदिवासी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोळी महादेव समाजाने पुकारला पुन्हा एल्गार

*जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सत्याग्रह आंदोलनातील प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.10.नांदेड जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमातीचे लोक बहुसंख्येने वास्तव्यास आहेत.परंतु शासननिर्णयानुसार त्यांच्या पाल्यांना जमातीची जात प्रमाणपत्रे मिळण्यासाठी प्रशासनस्तरावरून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याने या समाजातील हजारो मुले – मुली व्यावसायिक उच्च शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधीपासून वंचित राहत असल्याने हताश झालेल्या या समाजाने एल्गार पुकारला असून आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मोर्चा,धरणे आंदोलन आणि सत्याग्रह अशा विविध सनदशीर मार्गाने मागील काही दिवसांपासून सामाजिक संघर्ष सुरू केला असून तो अद्यापही सुरूच आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर ही जमातीची प्रमाणपत्रे देण्यासाठी तेथील प्रशासन स्तरावर कांहिशा हालचाली दिसून आल्या. तसेच या सातत्यपूर्ण आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक आमदार आणि काही लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही सर्व प्रलंबित जमाती प्रमाणपत्रे लवकरच देण्याचे आश्वासन दिले होते.परंतु प्रशासन स्तरावरील नेहमीचा उदासीनपणामुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली असल्याने या समाजातील शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी झाले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आज सोमवार ( दि.१० एप्रिल ) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले असून जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाचे हजारो पुरुष महिला या आंदोलनात सहभागी झाले आहेत.तसेच विविध ठिकाणच्या प्रशासन स्तरावर प्रस्तावित आणि प्रलंबित असलेली जमाती प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया मार्गी लागणार नाही,तो पर्यंत हे सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार त्यांनी केला आहे.

शिवाय या आंदोलनाला विविध सामाजिक संस्था,संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून यावेळी आंदोलन कार्यकत्यांनी प्रचंड घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशः दणाणून सोडला.
यानिमित्ताने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
अनुसूचित जमातीचे जाती प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सन 2000 मध्ये कायदा व सन 2003 मध्ये नियमावली निश्चित करण्यात आली असून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र साठी नातेवाईक यांचे जात वैधता प्रमाणपत्र किंवा जातीचे प्रमाणपत्र तसेच 1950 पूर्वीचे जमात सिद्धतेचे अभिलेखांची तसेच वास्तव पुराव्यासाठी मानवी तारीख नोंद पुराव्याची अनिवार्यता नाही.संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी अनुसूचित जमातीच्या लोकांना गाव स्तरावरून सामाजिक मूल्यमापन करून घेऊन जमातीचे जाती प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

केवळ सोशल ऑडिटवर आधारित कार्यपद्धतीचा वापर करून नांदेड जिल्ह्यातील अंध,गोंड,भिल्ल, पारधी या अनुसूचित जमातीच्या लोकांना कोणतीही अट न लावता सुलभतेने जाती प्रमाणपत्र देण्यात येतात.परंतु कोळी महादेव जमातीसाठी पक्षपाती पणाची भूमिका घेऊन सन 1950 पूर्वीचा पुरावा शालेय पुरावा, मानवी तारीख,रक्ताचे वैधता व जाती प्रमाणपत्राची मागणी करूनही जाती प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहे. विविध कारणे सांगून अडवणूक केली जात आहे.परंतु ज्यांनी ‘अर्थ’पूर्ण मागणीची पूर्तता केली त्यांना मात्र कोणतीही अट न लावता प्रमाणपत्र देण्यात येते.यामुळे या समाजातील गोरगरीब,अतिशय दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगणारे कोळी महादेव जमातीच्या लोकांना जाती प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना आरक्षणाचा कोणताही लाभ आज पर्यंत मिळालेला नाही.

विशेष म्हणजे या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात 15 आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्र राज्यात एकूण लोकसंख्येच्या 9.35 टक्के आदिवासी जमात वास्तव्यास असून आदिवासी क्षेत्रामध्ये त्यापैकी 3.9 टक्के तर आदिवासी क्षेत्राबाहेर 5.4 टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास असल्याचे व आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे विधानमंडळात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे.

तथापि आदिवासी क्षेत्र किंवा क्षेत्राबाहेरील वास्तव्यास असणाऱ्या एकाही कोळी महादेव जमातीच्या व्यक्तीस जाती प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाकडून या अभियानात देण्यात आलेले नाही.परंतु अन्य जमातीच्या लोकांना मात्र या अभियानांतर्गतचा लाभ देऊन कोळी महादेव जमाती बाबत पक्षपातीपणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.नांदेड जिल्ह्याअंतर्गत सर्व आठही व उपविभागीय कार्यालयासमोर कोळी महादेव जमातीच्या लोकांनी सत्याग्रह केलेला आहे.

त्यावेळी काही प्रमाणात जाती प्रमाणपत्र द्यायचे त्यानंतर जाती प्रमाणपत्र देणे बंद करायचे असा हिटलरशाही मानसिकतेचा गैरप्रकार जिल्हा प्रशासनाकडून होत असल्याने आंदोलक आदिवासी समाज बांधवांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान,नांदेड जिल्ह्यात आजघडीला अंदाजे पाच हजार अर्ज कोळी महादेव जमाती प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रलंबित आहेत.

त्यावर तात्काळ निर्णय घेऊन ही सर्व जाती प्रमाणपत्र मिळेपर्यंत हा बेमुदत सत्याग्रह सुरू केलेला असून न्याय मिळेल तो सुरूच राहणार असल्याचा इशारा आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख सत्याग्रही श्री परमेश्वर गोणारे यांनी यावेळी घणाघाती भाषण करताना दिला आहे.

या सत्याग्रह आंदोलनात आदिवासी कोळी महादेव जमातीचे विद्यार्थी,महिला,ज्येष्ठ नागरिक,युवक हे हजारोच्या संख्येने सहभागी झाले असून जिल्हा प्रशासन या अनुषंगाने आता किती जलद गतीने ही सर्व प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया मार्गी लागणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशी माहिती परमेश्वर गोणारे संस्थापक अध्यक्ष
आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषद,नांदेड.यांनी दिली आहे.

111 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.