वझरा शेख फरीद गावठाण विस्तारवाढ करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदार माहूर यांना उचित कारवाई करण्याचे आदेश ( अर्जदार महिला पुरुष लढण्यासाठी सज्ज; ड्रोन कॅमेऱ्याने झाली वझरा गावाची पाहणी)
नांदेड/प्रतिनिधी : सीटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने कुंभारी सोलापूर रे नगरच्या धरतीवर मौजे वझरा येथे प्लॉट्स उपलब्ध करून घरे बांधून देण्याची मागणी माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद येथील पीडित नांगीकांनी जिल्हाधिकारी,तहसीलदार आणि गटविकास अधिकारी पं.स.माहूर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी केली आहे.वझरा हे गावं स्वातंत्र्य पूर्वी पासून ऐतिहासिक असून पर्यटन स्थळ आहे.मागील पन्नास वर्षामध्ये वझरा येथे गावठाण विस्तारवाढ झालेला नाही.
कारण गावखारीची चोहबाजूची जमीन शासकीय तथा देवस्थानची असल्यामुळे तेथे अधिकृत प्लॉट्स पाडता येत नाहीत;किंबहुना ताबेदार सोईनुसार जमीन विक्री करून शासनाची फसवणूक करीत आहेत आणि बळजबरीने अतिक्रमण केले असे भासवत आहेत. ह्या मध्ये सरकारी अधिकारी देखील पुण्य वाटून घेत आहेत. शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक जन गावसोडून दुसऱ्या गावात स्थलांतरीत होत आहेत.
येणाऱ्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये सीटूचे आमदार कॉ.विनोद निकोले आणि माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याची जिल्हास्तरीय गावठाण विस्तारवाढ परिषद घेणार – कॉ. गंगाधर गायकवाड (जनरल सेक्रेटरी सीटू,नांदेड जिल्हा)
——————————————
सिटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड हे अखंड पाठपुरावा करीत असून दिनांक २७ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६७ नुसार गावठाण विस्तारवाढ योजनेची अंमलबजावणी करावी आणि वझरा येथे मागील पन्नास वर्षांपासून विस्तारवाढ झाला नसल्यामुळे तातडीने तेथे प्लॉट्स पाडून मागणी केलेल्या गरजू अर्जदारांना वाटप करावे आणि सोलापूर येथील कुंभारीच्या धरतीवर घरकुल बांधून देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार तथा सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ.नरसया आडम यांनी असंघटित कामगारांना कुंभारी येथे साठ हजार घरकुल / घरे जागा उपलब्ध करून शासनाच्या वतीने बांधून दिली आहेत.
त्याच धरतीवर वझरा येथे प्लॉट उपलब्ध करून घरकुल बांधून देण्यात यावेत या मागणीसाठी सीटू कामगार संघटना नांदेड जिल्ह्यात लढा देत आहे.
सीटूचे राज्य सचिव आमदार कॉ.विनोद निकोले हे मंत्रालयात्तील पाठपुरावा करीत आहेत. सिटूच्या आजी आणि माजी आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत सीटूचा नांदेड जिल्हास्तरीय गावठाण विस्तारवाढ परिषद घेण्याचा मानस असून फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही परिषद घेण्यात येईल असे सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सीटूच्या मागण्याची दखल घेतली असून दि.२३ डिसेंबर रोजी तहसीलदार माहूर यांना पत्र काढून नियमानुसार उचित कारवाई करावी तसेच केलेल्या कारवाई बाबत कॉ.गंगाधर गायकवाड यांना अवगत करावे असे आदेशीत केले आहे.
दि.१० जानेवारी रोजी पासून संघटनेच्या वतीने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून शासकीय नियमानुसार कोरम पूर्ण झाला आहे.
संघटनेच्या मागणी नुसार ड्रोन कॅमेऱ्या द्वारे वझरा आणि गट ग्रामपंचायत आजनी येथील पाहणी झाली असून पर्यायी जागा देखील शासनास सूचित करण्यात आली आहे.
येत्या २५ जानेवारी रोजी शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दि.२० जानेवारी रोजी मौजे वझरा शेख फरीद येथे कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्जदार आणि सीटू सभासदांची मारोती मंदिर परिसरात बैठक संपन्न झाली असून संघटित होऊन एकमताने लढा तीव्र करण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. वझरा येथे झालेल्या बैठकीस महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या ग्रामपंचायत मध्ये विस्तारवाढ झाला नाही किंवा ज्यांना गावामध्ये घरासाठी जागा नाही किंवा अपुरी आहे अशा कामगार कष्टऱ्यांनी सीटू कार्यालयात येऊन संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
===