देशातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु
तेलंगणा मधील हैदराबाद:- शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे.
देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल. तसेच या 10 एकर परिसरात लेझर शो व्यतिरिक्त पुतळ्याच्या पायथ्याशी संसदेसारखी रचना केली जात आहे. डॉ.आंबेडकरांचे महानतेचे दर्शन घडविण्यासाठी डॉ.आंबेडकरांचे फोटो गॅलरी आणि मिनी थिएटर उभारण्यात येत आहे.
डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयात डॉ.आंबेडकरांच्या संसदेत केलेल्या भाषणांचा वीडिओ आणि त्यांच्या जीवनावर आधारित फिचर फिल्म सुद्धा लोकांना दाखवले जातील.
2016 मध्ये पायाभरणी
14 एप्रिल 2016 रोजी डॉ.आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळा बसविण्याची पायाभरणी करण्यात आली होती. एस.सी कॉपोरेशनच्या वतीने रस्ते आणि इमारत विभाग सुमारे 150 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवत आहे. हा पुतळा अंदाजे 45 फूट रुंद असेल, ज्यामध्ये 9 टन वजनाचा कांस्य त्वचेचा लेप असेल, पुतळ्याची फ्रेम 155 टन स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आली आहे.