किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मिशन कवचकुंडल अंतर्गत जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोंबर दरम्यान कोरोना लसीकरणाची विशेष मोहिम ; लसीकरण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड दि. 8 :- जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती मिळावी व अधिकाधिक नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित करता यावे या उद्देशाने मिशन कवचकुंडल राबविले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही मोहिम 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत राबविली जात असून नांदेड जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाव पातळीवर जनजागृतीसह विशेष नियोजन केले आहे. लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यानी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

कोरोनापासून सुरक्षित राहावयाचे असेल तर लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. लसीकरण म्हणजे संरक्षक कवचकुंडले आहेत. 18 वर्षावरील ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही आणि लसीचा दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तो घेणे आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनापासून बचावासाठीची खरी कवचकुंडले प्राप्त होणार आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यास मदत होते. कोरोना आजार झाल्यास लवकर बरा होऊ शकतो आणि मृत्यूदर कमी राखण्यास मदत होते.

जिल्ह्यात पहिला डोस अद्यापही घेतलेला नाही असे, आणि पहिला डोस घेऊन दुसरा डोस न घेतलेल्याची संख्या मोठया प्रमाणात आहे. राज्य पातळीवरुनही लसीचा मुबलक पुरवठा या मोहिमेसाठी केला असून आरोग्य विभागातर्फे विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट उदभवू नये यासाठी सर्वाचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. या मोहिमेमध्ये नांदेड जिल्ह्यासाठी ८ ते १४ ऑक्टोंबर या कालावधीत पाच लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या मोहिम कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी तसेच ग्रामीण भागात सर्व शासकीय रुग्णालये, गावपातळीवर विविध ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

18 वर्षावरील सर्व व्यक्ती तसेच चौथा महिना पूर्ण झालेल्या सर्व गरोदर माता यांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याचबरोबर ज्यांनी आजवर एकही डोस घेतला नाही त्यांनी व ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांना या मोहिमेत लसीचा डोस दिला जाणार आहे. या मोहिम काळात गावपातळीवर विविध शाळेच्या ठिकाणी लसीकरण होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

जिल्ह्यात कोरोनासाठीचे निर्बंध सध्या काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली झाली आहेत. आता नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. लवकरच दिवाळीचा सण येणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी वाढते आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून संभाव्य कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची सुरक्षितता घ्यावी व या कवचकुंडल मोहिमेला यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर –घुगे आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.

77 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.