किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल जिल्हा परिषद सिईओ मीनल करनवाल यांनी दिली ग्‍वाही

– पायाभूत सुविधांमध्‍ये यावर्षी वाढ
– सुरक्षा, स्‍वच्‍छता, जागरुकतेकडे लक्ष
– लावणी महोत्‍सव यावर्षीही आकर्षण
– पाच दिवसांच्‍या नियोजनाची माहिती जाहीर

नांदेड, 17 डिसेंबर: महाराष्‍ट्रातील महत्‍वपूर्ण तसेच दक्षिण भारतात प्रसिध्‍द असलेली असलेल्‍या माळेगाव यात्रेला यंदाही संस्‍मरणीय ठरविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन कामाला लागले आहे. यंदा अधिक प्राथमिक व मुलभूत सुविधा उपलब्‍ध केल्‍या जातील. या यात्रेचे औचित्‍य, महत्‍व आणि परंपरेला जोपासण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेमार्फत पूर्ण प्रयत्‍न केले जातील, अशी ग्‍वाही जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली.

आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशंतवराव चव्‍हाण सभागृहात माळेगाव यात्रा पूर्वतयारी संदर्भात पत्रकार परिषद घेण्‍यात आली, त्‍यावेळी त्‍यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, समाज कल्याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील गिरी, नरेगाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम संजय शिंदे, विशाल चोपडे, आदींची यावेळी उपस्थिती होती

दिनांक 29 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्‍या कालावधीमध्‍ये माळेगाव यात्रा असेल. 29 डिसेंबर रोजी देवसवारी आणि पालखी पुजनाने यात्रेची सुरुवात होणार आहे. पाच दिवसांमध्‍ये शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी व पशु प्रदर्शन असेल. कृषिनिष्‍ठ शेतक-यांचा सत्‍कार, अश्‍व, श्‍वान, कुकूट प्रदर्शन व विविध स्‍पर्धेचे उद्घाटन, कुस्‍त्‍यांची दंगल, पारंपारीक लोककला महोत्‍सव, महिला आरोग्य शिबिर तसेच शेवटच्‍या दिवशी लावणी महोत्सव प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

कुस्ती दंगल व लोककला महोत्सव: पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यंदाची यात्रा प्‍लास्टिकमुक्‍त यात्रा करण्‍यावर भर असेल. कचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर, हॉटेल व खानावळांसाठी डस्टबिन्स ठेवण्यात येतील. मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती आणि महिला बचत गटांकडून कापडी पिशव्यांचे स्टॉल्स उभारले जातील. ॲम्बुलन्स आणि रुग्णवाहनासाठी बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मागील वर्षी तलावाच्या 50 टक्के पायऱ्यांचे काम पूर्ण झाले होते, यंदा उर्वरित पायऱ्यांसह पालखीसाठी ओटा तयार केला जाईल. रस्ते मोकळे ठेवून छोटे व्यापारी एकत्रितपणे ठराविक जागेवर दुकाने लावू शकतील, असे जिल्हा परिषदेने नियोजन केले असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले आहे.

जिल्हा परिषदेने महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, अन्‍न व औषध प्रशासन, अग्निशमन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, बीसएसएनएल, राज्‍य परिवहन महामंडळ, देवस्थान समिती आणि अन्य विभागांच्या समन्वयाने यात्रा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले. यात्रेतील प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुविधा-संपन्न वातावरण देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्‍याचेही त्‍या म्‍हणाल्‍या. जिल्हा परिषदे कडून होणाऱ्या या उपायोजनेत व सुविधांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी स्वच्छता राहण्यासाठी जागरूक असावे तसेच सहकार्य करावे, विद्यार्थी स्वयंसेवक व यात्रेकरूंनी देखील यात्रेमध्ये शासनाने निर्माण केलेल्या सोयी सुविधांचा उपयोग घ्यावा तसेच स्वच्छता व शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

95 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.