जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आमरण उपोषण
जिवती/प्रतिनिधी: दिनांक 7 डिसेंबर 2023 गुरुवारी रोजी दुपारी 1 वाजता पासून तहसील कार्यालय जिवती समोर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीनाच्या मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे प्रसिद्धी पत्र काढून कळविण्यात आले आहे.
भारत देशात स्वातंत्र्याची 75 वी सुवर्ण जयंती महोत्सव साजरा होत असले तरी जिवती तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी भूमहीन यांनी अनेक हाल अपेष्टा अन्याय अत्याचार सहन करून गेल्या 70 वर्षांपासून जमिनी वाहिती करून गुजरान करीत आहेत, परंतु इतक्या वर्षानंतरही राजकीय पुढार्यांनी जिवती तालुक्यातील भूमी शेतकऱ्यांच्या जमीन पट्ट्याचा विषय मार्गी लावण्याचे धाडस कोणत्याही राजकीय नेत्यांनी केली नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्याचे दोन पिढ्या पूर्ण झाल्या, परंतु तिसऱ्या पिढीला ही स्वतःच्या जमिनी चा पट्टा व सातबारा मिळाला नाही. म्हणून लोकशाहीमध्ये हक्क व अधिकारासाठी लढणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा मालकी हक्क त्यांना मिळावा यासाठी शेतकरी पुत्र म्हणून आमरण उपोषण करीत असल्याने सर्व जिवती तालुक्यातील नागरिकांनी यात प्रचंड जनसमुदाय सहभागी होऊन येणाऱ्या आपल्या पिढीसाठी आपले अमूल्य योगदान द्यावे व या लढ्यात सर्वाधिक सामील होऊन आपल्या हक्कासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिवती तालुका भुमहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती जिवती जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या :-
1) जिवती तालुक्यातील जमिनीची संयुक्त मोजणी करून तीन पिढ्यांची आठ रद्द करून जमिनीवर ताबा असलेल्या अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना तात्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे व गायरान जमिनीचा ताबा कायम करण्यात यावे.
2) जिवती तालुक्यातील सातबारा फेरफार करणे व वारसदार नोंदी तात्काळ करण्यात यावे.
3) यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना सुधारित आकृतीबंध देऊन किमान वेतन देण्यात यावे.
4) जातीचे दाखले (कास्ट सर्टिफिकेट )सर्व जातींना देण्यात यावे व ग्रह चौकशीनुसार जात वैधता प्रमाणपत्र त्याच स्व जिल्ह्यात देण्यात यावे.
5) जिवती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कर्मचारी पद भरती करून रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात यावे व तालुक्यातील सर्व उपकेंद्रातील कर्मचारी नियुक्ती तात्काळ करण्यात यावे.
6) जिवती नगरपंचायत येथील मंजूर असलेल्या 664 घरकुलांना बांधकाम करण्याची परवानगी वनविभागाकडून तात्काळ देण्यात यावी.
7) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावे व सरसकट पीक विमा देण्यात यावे.
8) केंद्र शासनाने तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्याचे निर्मिती करावी.
9) स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय सरकारने तात्काळ मागे घेण्यात यावे रीडिंग नुसार बील देण्यात यावे.डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन तात्काळ देण्यात यावे.
10) जिवती तालुक्यातील सर्व कंपनीचे मोबाईल टावर तात्काळ सुरू करण्यात यावे. 11) आदिवासी बांधवांचे वन हक्काचे पट्टे फेरफार करून सातबारादेण्यात यावी.
12) कुंभेझरी येथील मंजूर असलेल्या नवीन 11 केवी फिडरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
या मागणीसाठी सुग्रीव अर्जुनराव गोतावळे, विजय लक्ष्मणराव गोतावळे, सुदाम रामराव राठोड, बालाजी गुणाजी भुते पाटील, लक्ष्मण दौलत राव मंगाम, विनोद किसन पवार, शब्बीर भाई जहांगीरदार, मुकेश प्रकाश चव्हाण, प्रेम देवला चव्हाण, दयानंद देविदास राठोड हे उपोषणात सहभागी होणार आहेत.