किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लोकसहभागातून आदर्श शाळेकडे वाटचाल करणारी जि प टेकामांडवा शाळा

जिवती प्रतिनिधी: नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, डोंगराळ ,मागास, विकासापासून कोसो दूर असलेला तालुका अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुका। शिक्षण ,आरोग्य या बाबतीत बराच मागे असलेला तालुका अशीही ओळख या तालुक्याची आहे। पंचायत समिती जीवती अंतर्गत टेकामांडवा बीटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा ही इ 1 ली ते 7 वी पर्यंत वर्ग असणारी मराठी माध्यमाची शाळा येते। 10 ऑक्टोबर 2020 ला या शाळेत विषय शिक्षक म्हणून रुजू झालो तेव्हा या शाळेची अवस्था अतिशय दयनीय होती अर्थातच यामध्ये गावातील गावकरी पालकवृंद व प्रशासनाचेही कदाचित दुर्लक्ष झालेले असावे असे पाहताक्षणी पहिल्याच दिवशी लक्षात आले ।जानेवारी 2010 ला बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समिती अंतर्गत कोथरूळ या जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू होताना जी चित्र डोळ्यासमोर दिसले होते व त्यानंतर पुढील दहा वर्षात शाळेचा केलेला कायापालट याची आठवण त्या क्षणाला झाली ।त्या क्षणी मनात विचार केला की पुन्हा एकदा त्याच जिद्दीने आणि त्याच जोमाने काम करावे लागेल अर्थातच मागील दहा वर्षाचा अनुभव यामागे होता।
शाळेला गावाचा आधार असावा व गावाला शाळेचा अभिमान वाटावा या उक्तीप्रमाणे आपल्याला काम करावे लागेल व गावकऱ्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटवून देऊन त्यांना या प्रवाहात सामील करून घेणे महत्त्वाचे होते। ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण जगात थैमान घालत होती अशा वेळेस एकीकडे शाळा बंद होत्या शाळेची दुरावस्था अतिशय बिकट झालेली होती। विद्यार्थी संख्या अगदीच म्हणजे एकूण 122 चा पट होता ।अशा परिस्थितीत काम करणे अतिशय कठीण होते। केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे मी माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना विश्वासात घेऊन कोरोना काळामध्ये शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम चालू केला। ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने शक्य असेल तितके जास्तीत जास्त विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो। सहकारी शिक्षकांच्या मदतीने गावात जाऊन लोकांना जागृत करावं या भावनेने आम्ही गावातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो आणि त्यात यशही आले।
संपूर्ण जगात कोरोना महामारी पसरली असल्यामुळे अर्थातच शाळा, महाविद्यालय, कॉलेज ,काम सर्व काही ठप्प पडले होते। त्यामुळे त्यावेळी आम्हाला जास्तीत जास्त गावकरी, पालकवृंद, शिक्षण प्रेमी नागरिक ,माजी विद्यार्थी अगदी घरीच भेटत होते त्यामुळे अगदी अल्पावधीत संपूर्ण गावभर आम्ही सुरू केलेल्या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळू लागला। अनेक माजी विद्यार्थी याच शाळेत शिकून गेलेले परंतु आज कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा माझी शाळा माझा गाव नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला व त्या माध्यमातून जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। त्यावर अतिशय सकारात्मक विचार सर्वच माजी विद्यार्थ्यांचे येत होते मग आम्ही शाळेचे रूपडे बदलण्यासाठी लोकसहभाग जमवून त्यातून शाळेला एक वेगळी दिशा देण्याचा निर्णय घेतला व अगदी एक महिन्याच्या आत एक लाखापेक्षाही जास्त रोख स्वरूपात लोकसहभाग माझी शाळा माझा गाव या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जमा झाला ।सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन शाळेत महत्त्वाचे काम कोणती करायचे आहेत याची यादी बनवली व त्याप्रमाणे कामाला लागलो।शाळा बंद असल्यामुळे काम करायला पण खूप वावही होता ।काही लोकांनी शाळेला श्रमदानातून मदत दिली तर काही गावकऱ्यांनी शाळेला आवश्यक असलेल्या भौतिक सोयी सुविधा पुरविल्या या प्रकारे अल्पावधीतच टेकामांडवा शाळा नव्या रूपाने तालुक्यात समोर आली। कोरोना काळात लाखो रुपयांचा निधी जमा करणारी कदाचित महाराष्ट्रातली पहिली शाळा असावी म्हणून विविध वर्तमानपत्रांनी देखील याची दखल घेतली व सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला ।त्यानंतर हा ओघ तिथेच बंधन न राहता पुढे पुढे लाखो रुपयांचा निधी शाळेला जमू लागला व शाळेच्या भौतिक सोयीसुविधा व सौंदर्यकरणावर तो खर्च केला गेला त्यामुळे शाळा एका नव्या रूपाने समोर आली ।त्यानंतर कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने टेकामांडवा शाळेला एक वेगळी दिशा मिळाली। माझे सहकारी किसन बावणे, रुपेश मांदाळे, दत्ता दोरे,उषा डोये, मुखळा मलेलवार, मुख्याध्यापक लचू पवार, केंद्रप्रमुख सुनील कोहपरे, संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,शिक्षण प्रेमी स्वयंसेविका दीपिका सोलनकर या सर्वांच्या मदतीने शाळेमध्ये वाचनालयाची सुरुवात केली याचा फायदा गावातील सर्वच विद्यार्थ्यांना झाला। विशेष करून कोरोना काळात जी मुले घरी होते त्यांच्या वाचनामध्ये मोठा खंड पडला होता त्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हे वाचनालय अतिशय उपयुक्त ठरले । पुढील काळात तत्कालीन सीईओ मिताली सेठी मॅडम यांच्या मिशन गरुडझेप या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुपर 60 सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि पुनश्च एकदा शाळेमध्ये विविध कार्यक्रमांची ,उपक्रमांची मांदियाळी सुरू झाली। स्कॉलरशिप, नवोदय, शालेय मंत्रिमंडळ ,शालेय बचत बँक ,वाचनालय, शालेय बाग ,फुल झाडांची लागवड करणे, अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे ,एक विद्यार्थी एक झाड, पियर लर्निंग, खेळाच्या माध्यमातून नैतिक मूल्य शिकविणे ,बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर, वृक्षमित्र, क्षेत्रभेट, आदर्श परिपाठ,स्काऊट गाईड, क्रीडा स्पर्धा, नवोपक्रम स्पर्धा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, नवरत्न स्पर्धा अशा अनेक स्पर्धा, उपक्रम शाळेत मोठ्या प्रमाणात होऊ लागले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेली विविध कलागुणांना वाव मिळू लागला व पालक व विद्यार्थी दोघांचाही शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला। झोपावणाऱ्या पंखांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी या दिशादर्शक पंक्तीतून अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम म्हणून पियर लर्निंग हा उपक्रम शाळेला नव संजीवनी देणारा ठरला। मुलांनीच मुलांना शिकविणे या माध्यमातून मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्याची शालेय मंत्रिमंडळाची कल्पना अतिशय भन्नाट होती ।रोज एक तास सकाळी गणित व सायंकाळी मराठी या विषयाच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत दर्जेदार सुधारणा झाली। दरवर्षी स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थी पात्र होऊ लागले। विद्यार्थ्यांची उपस्थिती, गुणवत्ता यामध्ये दर्जेदार बदल झाला ।शाळेच्या विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली। पालकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ।या सर्व कारणामुळे शालेय प्रशासनालाही टेकामांडवा शाळेची दखल घ्यावी लागली म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून विविध सोयी सुविधा तसेच वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन पुरविण्यात आले। त्यामुळे विद्यार्थी -शिक्षक- पालक -गावकरी व प्रशासन या सर्वांचा व्यवस्थित मेळ बसल्यामुळे टेकामांडवा नावाची एक नवीन आदर्श शाळा उदयास आली। या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात, विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक वृंद वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करीत असतात ।कला, क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक या सर्वच क्षेत्रांमध्ये टेकामांडवा शाळेतील विद्यार्थी आता चमकू लागलेले आहेत म्हणून गाव करील ते राव करू शकत नाही या उक्ती प्रमाणे लोकसभागातून दर्जेदार गुणवत्तेकडे वाटचाल करीत असलेली जिल्हा परिषदेची टेकामांडवा शाळा येत्या काळामध्ये निश्चितच बराच मोठा पल्ला गाठेल यात मात्र दुमत नाही।

58 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.