*Evm हे महाविकास आघाडी च्या पराभवाचे कारण असू शकते पण तेच एकमेव कारण नाही -डॉ अंकुश अ गोतावळे*
*Evm हे महाविकास आघाडी च्या पराभवाचे कारण असू शकते पण तेच एकमेव कारण नाही **
डॉ अंकुश अ गोतावळे
8390902408
*Evm वर पराभवाचे खापर फोडून महाविकास आघाडी मतदारांना आकर्षित, आश्वासित करण्यात तसेच नियोजनात कमी पडली हे लपवू शकणार नाही!!!*
नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागले त्यामध्ये महायुती ला भरभरून यश मिळाले त्याबद्दल महायुती चे मनपूर्वक अभिनंदन..
निकालानंतर वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला. त्यात महाविकास आघाडी च्या पराभवाला EVM हेच जबाबदार असल्याचे अनेकांनी सांगितले.पराभवाच्या अनेक कारणापैकी EVM हेही एक कारण असू शकते पण EVM हेच एकमेव कारण आहे असे अजिबात नाही.इतर गोष्टी विचारात न घेता फक्त EVM लाच दोष देणे म्हणजे पळवाट शोधण्यासारखे होईल.आणि जबाबदारी झटकायची म्हणून EVM ला दोषी मानले तर भविष्यात प्रत्येक कार्यकर्ता हेच म्हणेल की आम्ही कितीही प्रयत्न केले तरीही EVM महायुती लाच विजयी करणार आहे,तर मग विनाकारण कशाला धावपळ, मेहनत, संघर्ष करायचा आणि कार्यकर्ते नाउमेद होऊन निवडणूकांमध्ये कामच करणार नाहीत आणि हे पक्षाच्या तसेच लोकशाहीच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले नाही.त्यामुळे EVM वरील आरोप सिद्ध होईपर्यंत तो विषय बाजूला ठेऊया .म्हणून महायुती च्या यशाला ज्या इतरही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत त्याचा उलगडा होणे गरजेचे आहे. आणि आता महाविकास आघाडी ने पराभवाच्या मुख्य कारणांचा शोध घेऊन त्यावर मंथन, चिंतन करणे गरजेचे
असून निवडणुकीत झालेल्या चुकांचा शोध घेऊन त्या चुका स्वीकारून यापुढे त्या चुका होणार नाहीत याची काळजी घेत भविष्यातील निवडणूकांचे नियोजन करण्याची गरज आहे.असे केले तरच कार्यकर्ता, पक्ष आणि लोकशाही टिकेल.कारण कुठलीही हार म्हणजे शेवट नसतो.
बांधवानो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते अजिबात धक्कादायक नाहीत तर अपेक्षित असेच निकाल आहेत. फक्त महायुतीला मिळणाऱ्या जागांची संख्या 160ते 190 पर्यंत राहील असे वाटत होते, पण महायुती च्या बाजूने चौफेर मतांचा पाऊस पडू लागला आणि मतांच्या पुराऐवजी त्सुनामी आली आणि त्यामुळेच आकडा 230वर पोहोचला हे मात्र अनपेक्षित आहे.महायुतीच्या यशाची अनेक कारणे असतील पण खालील गोष्टीसुद्धा महायुती च्या यशाची कारणे असू शकतात असे मला वाटते.
1)
*वयक्तिक लाभाच्या योजना आणि लोकांची ‘शॉर्ट टर्म मेमरी’*
लोकांची स्मरणशक्ती कमजोर असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कारण पक्ष फुटणे, खोके वाटप होणे,गद्दारी चा कलंक असणे, महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जाणे या सर्व गोष्टी लोकं एका झटक्यात विसरले.आणि तसेही लोकांना पक्ष फुटणे ,सत्ताबद्दल होणे याच्यात काहीही देणेघेणे नसते.तर स्वतःच्या पदरात प्रत्यक्षात काय पडते, वयक्तिक लाभ काय होतात यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो.त्यामुळे त्यांना इतर बाबींचे विस्मरण होणे साहजिक आहे.आणि लोकांची *शॉर्ट टर्म मेमरी* असते याचे अचूक ज्ञान असलेल्या महायुती च्या चाणाक्ष नेत्यांनी सरकारच्या माध्यमातून निवडणूकीच्या 6 महिने अगोदर पासून अशा काही योजना आणल्या की लोकांच्या खात्यात थेट पैसा जमा होईल,वैक्तिक लाभामुळे लोकं ‘सर्वम पापे हरेहरे’ म्हणत भूतकाळात महायुती ने केलेले सर्व कांड विसरून जातील. आणि झालेही तसेच अनेक योजणांच्या प्रत्यक्ष आर्थिक लाभामुळे लोकं जुने सर्व काही विसरले आणि महायुती पापमुक्त झाली असे वातावरण महाराष्ट्रात तयार करण्यात महायुती यशस्वी झाली .आणि लोकं योजनांच्या मिळालेल्या पैशाच्या आनंदात, *आनंदाच्या सिद्यात*, भावाने *लाडक्या बहिणींना* दिलेल्या ओवाळणीत जाम खुश झाली. आणि महागाईच्या काळातही दिवाळीच्या दिवसात कुठल्याही दुकानात पाय ठेवायला जागा नाही अशी गर्दी यावर्षी बाजारपेठेत दिसली.खिशाला कसलीही झळ न लागता वरच्या वर आटोपलेल्या दिवाळीमुळे आणि फुकटच्या मिळालेल्या पैशामुळे प्रत्येक घरातील नात्यांमधील गोडवा यावर्षी जरा जास्तच जाणवला. आणि हे महायुती सरकारमुळे घडत आहे अशी कुजबुज प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात होताना दिसली.आणि अशा फुकटच्या पैशाच्या योजनाचे अर्ज आचार संहिता लागण्याच्या दिवसापर्यंत भरण्यात आणि योजनासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यात लोकांना सरकारने गुंतवून ठेवले आणि दुसरा विचार करण्याची त्यांना फुरसतच दिली नाही. महागाईने त्रस्त झालेली जनता अचानकपणे आणि न मागता मिळालेल्या पैशावर खुश झाली आणि यापुढेही फुकटचे मिळत राहावें अशी मनोकामना बाळगून, जप करू लागली आणि हेच सरकार राहावें म्हणून देव पाण्यात बुडवून बसली. निवडणुका लागल्यानंतर जर आमचे सरकार गेले तर तुम्हाला या योजना मिळणार नाहीत असा प्रचार महायुतीच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भाषणामधून,प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केला आणि लोकांना ते खरे वाटले. कारण हातचे सोडून दुसऱ्याच्या तोंडाकडे बघण्यात लोकांना रस नसतो. आणि हातचे टिकण्यासाठी सरकार टिकले पाहिजे म्हणून लोकंच चर्चा करू लागली यात *लाडक्या बहिणी* आघाडीवर होत्या.सोबतीला शेतीसाठी मोफत वीज,महिलांना फुकटचा बस प्रवास, कुठल्याही जातीच्या मुलींना मोफत शिक्षण यासारख्या योजना लोकांच्या खिशाची झळ कमी करणाऱ्या होत्या, त्यामुळे घरातील आर्थिक टंचाईचा थेट फटका हा महिलांना बसत असतो त्यामुळे या योजनामुळे सुखावलेल्या महिला म्हणजेच लाडक्या बहिणींनी महायुती च्या भावांना भरभरून मतरूपी आशीर्वाद दिले ते नाकारता येणार नाही.
2)
*मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब सर्वांसाठी आपला माणूस*
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब भाषणात नेहमी म्हणतात की, मी नेता नाही तर सामान्य कार्यकर्ता आहे आणि 24 तास जनतेत राहुन जनतेचे कामं करतो , मी फेसबुकद्वारे बोलत नाही तर फेस टू फेस बोलतो. आणि हे तंतोतंत खरे आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यांना भेटण्यासाठी कुठल्याही शिष्टमंडळाला तारेवरची कसरत करावी लागलेली नाही त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते, लेखक -विचारवंत, कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांची प्रतिमा आपला माणूस अशीच तयार झाली.आणि अनेक संघटनानी मा.शिंदे साहेबांना भेटून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि त्यावर मा. शिंदे साहेबांनी तात्काळ कारवाई करीत अनेक प्रश्न निकाली काढलेले आहेत. आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील या सर्वांचे मानधन 15 हजार करणे,कोतवाल, ग्रामपंचायत चे डाटा एंट्री ऑपरेटर यांचे मानधन वाढविणे, सोबतच बेरोजगार तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार संधी आणि आर्थिक लाभ करून देणाऱ्या योजना सुरु करणे यामुळे *गावकुसात* राहणारा प्रत्येक घटक आनंदी होता आणि हे सर्व मा. शिंदे साहेब यांच्या हिम्मतबाज निर्णयामुळे घडले होते.त्यामुळे स्व.मा. विलासराव देशमुख यांच्या नंतर जनतेला आपला वाटलेला मुख्यमंत्री म्हणजे मा. शिंदे साहेब हे होत. त्यामुळे कोणताही समाजघटक असो किंवा नोकरवर्ग असो त्यांनी स्वयंस्फूर्तपणे शिंदे साहेबांच्या महायुतीला आशीर्वाद दिल्याचे दिसून आले.
3)
*आतापर्यंत दुर्लक्षित ठेवलेल्या दुर्बल समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून सन्मान आणि संधी दिल्यामुळे सोशल इंजिनियरिंग यशस्वी*
आजपर्यंत ज्या समाजाची कधीच कुठल्याही सरकारांनी साधी दखल देखील घेतली नव्हती त्या समाजाच्या समस्या, अडचणी ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढून अशा समाजाच्या बाबतीत धोरनात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय दिला. उदाहरणासाठी मातंग समाजासाठी आर्टी, बंजारा समाजासाठी वनार्टी ची स्थापना केली.अनेक महामंडळाची निर्मिती करून नवीन तसेच जुन्या महामंडळाना भरघोस निधी दिला. तसेच अनेक जातीच्या नेत्यांना वेगवेगळ्या महामंडळावर नेमनुका करून त्यांचे पुनर्वसन केले तसेच नवीन चेहऱ्याना महामंडळ, स्मारके, समित्या या ठिकाणी संधीही दिली.तसेच ज्या जातींची महाराष्ट्रात अर्धा टक्का लोकसंख्या नाही अशा समाजाच्या प्रतिनिधीना तिकीट देऊन प्रत्यक्ष निवडणूकीमध्ये उभे केले. (उदा. वाल्मिकी,मेहतर, खाटीक इ समाज) .त्यामुळे छोटे छोटे समाज सुद्धा महायुती च्या बाजूने ताकतीने उभे राहिले.
अनुसूचित जातीची ची महाराष्ट्रातील टक्केवारी 13%असून त्यापैकी 8% मतदान हे एकट्या महायुती च्या बाजूने झालेले दिसले.याचे मुख्य कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार SC आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महायुती ने घेतलेला पुढाकार आणि महाविकास आघाडी च्या नेत्यांनी विनाकारण SC उपवर्गीकरनाला केलेला विरोध होय.SC मधील नवबौध्द वगळता इतर 58 जातीपैकी प्रत्येक जातीतील 70% मतदान हे महायुतीच्या बाजूने झाल्याचे दिसलें. आणि निवडणूकांचे निकाल बघितले तर अनेक ठिकाणी उमेदवार 2 ते 5 हजार मतांनी जिंकलेले आहेत, त्यामुळे जिंकण्यासाठी लागणारी मार्जिन इथे sc मधील 58जातीनी भरून काढलेली आहे, sc मधील याच जाती आतापर्यंत महाविकास आघाडी चे पारंपारिक आणि फुकटातले मतदान होते .तसेच Obc मधील बंजारा समाज, धनगर समाज, वंजारी समाज हे जवळपास 80% महायुती च्या बाजूने होते आणि इतरही संख्येने मोठया असलेल्या जातीपैकी 60% मतदार हे महायुती च्या बाजूने होते. त्यामुळे सर्वच समाज घटकांचा पाठिंबा मिळण्याचे कारण म्हणजे प्रत्येक समाजातील सामाजिक अस्मितांच्या स्थळांचा केलेला विकास, सोबतच मातंग समाज, बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या सामाजिक नेत्यांना विधानपरिषदेसाठी ऐनवेळी संधी देऊन लोकांना आपल्या बाजूने वाळविण्यात महायुती ला यश आले.आचारसंहिता लागण्याचा काही तास आधी विविध महामंडळावर नेमणूका करून काहींचे समायोजन केले तर काही सामाजिक नेत्यांना विधानसभेच्या तिकिटा देऊन प्रतिनिधित्व दिल्यामुळे प्रत्येक समाजाचा पाठिंबा मिळविण्यात महायुती ला यश आले.
4) *महाविकास आघाडी मधील नेत्यांचा लोकसभेच्या विजयानंतरचा फाजील आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील कार्यकर्त्यांचा निरुत्साह*:-
लोकसभेच्या निवडणूकीमध्ये महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त यश महाविकास आघाडी ला मिळाले. आणि त्यामुळे लोकांमध्ये जाऊन वातावरण निर्मितीसाठी जास्त काही ठोस कार्यक्रम न राबविता, पक्षांतर्गत उपक्रम न राबविता जनता आमच्या पाठीशी आपोआप उभी राहणार आहे असा कयास महाविकास आघाडी मधील नेत्यांनी बांधल्याचे जाणवले .केंद्रातील भाजप सरकार च्या धोरणाना,राज्यातील पक्षफुटीला कंटाळून आणि *ठाकरे-पवार-गांधी* या वलयांकित नावांना एकत्रित पाहून जनता आपोआप आपल्याच पाठीशी उभं राहणार आहे असा भाबडा आशावाद महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसू लागला होता.त्यामुळे प्रत्येक जातसमूहाला, वर्गसमूहाला त्यांच्या भल्याचे ब्लू प्रिंट दाखवून महाविकास आघाडीसोबत कसे जोडता येईल याची कुठलीही घडामोड दिसत नव्हती. तर जुन्या पद्धतीची आकडेमोड करून पारंपारिकपणे दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी मतदार महाविकास आघाडीसोबतच राहणार आहे ही धारणा बाळगून नेते वावरताना दिसत होते. पण हे पारंपरिक मतदार तरी आघाडीसोबत का राहतील याची कसलीही कारणमिमांसा नेत्यांकडे नव्हती. तर केवळ भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे नाईलाजाने आमच्यासोबत जुळतील हेच एक लॉजिक असेल असे समजावे लागेल. तसेच छोट्या छोट्या समाजातील जे कार्यकर्ते पक्ष संघटनेमध्ये राज्यपातळीवर आहेत त्यांनी केलेल्या सूचनांचा आघाडी मध्ये कधी विचारच होताना दिसला नाही असे कार्यकर्ते उघडउघड बोलत होते.त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडीसाठी केलेली कुठलीही सूचना पक्षामध्ये ऐकून घेण्यात आलेली नाही असे अनेकांकडून ऐकायला मिळाले . तसेच पक्षांतर्गत कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नव्हते त्यामुळे पक्षाचे छोट्या जातसमूहातील कार्यकर्ते अत्यंत नाराज होते तर धनदांडगे असलेले नेतेच एकत्र येऊन पक्षांतर्गत निर्णय घेतात असे वातावरण महाविकास आघाडी बाबत निर्माण झाले होते.या अशा लादल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेमुळे पक्षातील पदाधिकारी नाराज होते.तसेच महाविकास आघाडी च्या जागा वाटपाचा निर्णय घेत असताना *ठाकरे -पवार -गांधी* यांच्याकडून लगेच हिरवा कंदील मिळत नव्हता आणि त्यामुळे घटक पक्षातील चर्चेला बसणाऱ्या नेत्यांची त्रेधातिरपीट होत होती आणि घुसमट होऊन नेतेमंडळी धुमसत असल्याचे शेवटी शेवटी जाणवत होते. त्यामुळे आघाडी च्या तिकीट वाटपाचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु होता.आणी तिकीट वाटपानंतर जी बंडखोरी झाली ती रोखण्यात महाविकास आघाडी ला यश आले नाही, कारण इथे कोणीच कोणाला जुमाणत नव्हते असे चित्र दिसले. याउलट महायुती ने जिथे जिथे बंडखोरी झाली होती तिथे साम दाम दंड भेद वापरून झालेली बंडखोरी लगेच मोडून काढली.
तसेच महाविकास आघाडी च्या घटक पक्षातील छोट्या समुहाचे नेतृत्व करणारे जे पदाधिकारी होते,त्यांनी कितीही महत्वाची सूचना केली तरीही त्यांच्या बोलण्याकडे कुणीच गांभीर्याने पाहत नव्हते. कारण त्यांचा आवाज आणि पदही लहान होते.आणि एका विशाल जहाजाला बुडविण्यास एक छोटेशे छिद्र कारणीभूत ठरते ही गोष्ट महाविकास आघाडीच्या नेत्यांना समजून घेऊन त्यावर उपाय करण्यास सवडच नव्हती किंवा त्याकडे लक्ष देणे त्यांना गरजेचं वाटलं नाही.
सोबतच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांची उमेदवारावरील नाराजी सर्व महाराष्ट्रभर दिसून आली.प्रत्येकच विधानसभा मतदारसंघातून काही अपवाद वगळता आजी- माजी आमदारांना किंवा आजी-माजी आमदारांच्या रक्तातील नातेवाईकांना महाविकास आघाडीने तिकीट देऊन निवडणुकीत उभे केल्याचे दिसत होते. त्यामुळे वर्षानुवर्षे कधीतरी उमेदवारी मिळेल म्हणून पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते निरुत्साही दिसत होते.तसेच अनेकांनी बंडखोरी केली होती आणि त्यांना थांबविण्यात महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली आणि हे बंडखोर अनेक ठिकाणी महागात पडले.
सोबतच पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते *गोळीला आम्ही आणि पोळीला तुम्ही* म्हणजे निवडणूक प्रक्रियेत निष्ठावान कार्यकर्त्यांनी दिवसरात्र राबायचे, भाऊ -भावकीसोबत नातेवाईकांसोबत,स्थानिक लोकांसोबत आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी टोकाचा संघर्ष करायचा, मतदान मिळवून द्यायचे आणि एकदा का उमेदवार निवडून आला आणि आमदार झाला की निवडणूकीत उमेदवारासाठी काहीही न केलेली पण स्वतःचे स्वार्थ साधणारे हुजरे, मुजरे, दलाल आणि ठेकेदार अशी चांडाळचौकडी आमदाराच्या आजूबाजूला चोवीस तास वावरताना दिसल्याचा अनुभव निष्ठावंत कार्यकर्त्यांना होता.आणि याच चांडाळचौकडीची कामे प्रधान्यांने होताना पाहून आणि चांडाळानाच वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून होणारे आर्थिक लाभ पाहून निष्ठावान कार्यकर्ता दुःखी, हतबल आणि निरुत्साही झालेला दिसत होता. त्याची ही हतबलता त्याला निवडणूक काळात निष्क्रिय करीत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात दिसत होते.आणि निष्ठावान कार्यकर्त्याने निवडणुकीत धावपळ न केल्याचा फटका महाविकास आघाडी च्या उमेदवारांना बसल्याचे दिसले.
5)
*लक्ष्मीपूजनानंतर खरोखरच महायुती च्या उमेदवारांनी महाराष्ट्रभर मतदाराना लक्ष्मीदर्शन घडवून आणले*
यावेळेस च्या निवडणुका दिवाळी नंतर लगेचच झाल्या. आणि दिवाळीला मुख्य पूजा असते ती म्हणजे लक्ष्मीची. त्यामुळे लोकांनी लक्ष्मी पूजन करताना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लक्ष्मी ला साकडे घातले की आम्हाला पैसा, धन,समृद्धी मिळू दे. आणि यावेळेस मात्र लक्ष्मीमाता लोकांचे मागणे ऐकून खरोखरच प्रसन्न झाल्या.आणि निवडणूक काळात अक्षरशः महायुती च्या उमेदवारांनी पैशाचा पाऊस पाडला.ग्रामीण भागात एका मतदारास 500रु ते 2000रु पर्यंत तर शहरी भागात 2000रु पासून ते 5000रु पर्यंत चे दर्शन महायुतीच्या कुबेर उमेदवारांनी घडवून आणले.या लक्ष्मीदर्शनाणे मतदार राजा खूष झाला आणि *ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट* या न्यायाने मतदारांनी महायुती च्या उमेदवारांवर अक्षरशः मतांचा पाऊस पाडला. आजपर्यंत अनेकांनी विधानसभेच्या अनेक निवडणुका बघितल्या पण इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झालेला महाराष्ट्राने कधीच बघितले नव्हते ते यावेळेला पाहायला मिळाले. आणि म्हणतात ना युद्धात आणि निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद करण्याची मुभा असते. त्याचा पुरेपूर वापर महायुतीने केला आणि महाविकास आघाडी गाफिल राहिली. तसें पहिले तर महाविकास आघाडीचे उमेदवार असा पाऊस पडण्यात सक्षम नव्हते असे नाही पण गाफिल राहिल्यामुळे ते लक्ष्मीदर्शनाचे नियोजन करू शकले नसतील.आणि त्यामुळेच विजयात सुद्धा बरेच मागे राहिल्याचे दिसले.पैशे वाटपाची बाब निश्चितच समर्थनीय नाही पण काळाबरोबर घडून आलेला हाही बदल लोकांनी स्वीकारल्याचे दिसून आले.आणि वरील सर्व कारणामुळे महायुतीची घोडदौड झाली तर महाविकास आघाडी ची पीछेहाट झाली.
यासोबतीला EVM हॅक करणे, शेवटच्या काही तासामध्ये वाढलेली मतांची टक्केवारी हेही कारणे महायुती च्या यशात असू शकतात पण ते सिद्ध होईपर्यंत तरी वरील कारणेच प्रामुख्याने गृहीत धरावी लागतील.