KINWATTODAYSNEWS

संध्याछाया वृद्धाश्रम नांदेड येथे जनसेवा फॉउंडेशनच्या वतीने एल्डरलाईन 14567 व ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 संदर्भात कार्यशाळा संपन्न…

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.25. शहरातील संध्याछाया वृद्धाश्रम मालेगाव रोड,नांदेड येथे जनसेवा फॉउंडेशनच्या वतीने एल्डरलाईन 14567 आणि आई, वडिल व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-2007 नियम-2010 या विषयावर माहितीपर कार्यशाळा घेण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने संपूर्ण देशभरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी व सहाय्यासाठी एल्डर लाईन 14567 ची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डरलाईन – 14567) ही जनसेवा फॉउंडेशन, पुणे तर्फे चालविण्यात येत आहे.
याच अनुषंगाने एल्डरलाईन 14567 चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा हे नांदेड जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यावर असताना संध्याछाया वृद्धाश्रमास भेट देऊन वृद्धाश्रमातील उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना भारत सरकारतर्फे ज्येष्ठासाठी सुरु करण्यात आलेल्या 14567 हेल्पलाईनची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करून जे ज्येष्ठ नागरिक हे स्वतःच्या उत्पन्नामधून अथवा त्यांच्या मालमत्तेमधून स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाहीत, अशा व्यक्तींनी सदर कायद्याअंतर्गत परिपोषणासाठी/निर्वाहभत्त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचेकडे अथवा उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांचेकडे अर्ज करून स्वतःचा हक्क प्राप्त करावे असे आवाहन केले.
यावेळी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थित होती तर सदर कार्यक्रमाचे आयोजन 14567 एल्डरलाईनचे क्षेत्रीय प्रतिनिधी पांडुरंग मामीडवार यांनी केले.

41 Views
बातमी शेअर करा